अहमदनगर : पाथर्डी शहरात कॉपी पुरविणाऱ्यांचा पुन्हा शिक्षकावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:06 IST2023-03-24T14:05:10+5:302023-03-24T14:06:36+5:30
बारावीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतरही कॉपी थांबलेली नाही.

अहमदनगर : पाथर्डी शहरात कॉपी पुरविणाऱ्यांचा पुन्हा शिक्षकावर हल्ला
अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील बारावीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतरही कॉपी थांबलेली नाही. शुक्रवारी कॉपी पुरवणाऱ्या एका गुंडाने शिक्षक श्रीकांत काळोखे यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली.
काळोखे हे बारावीचा पेपर संपवून बाहेर पडत असताना त्यांच्यावर पवार नावाच्या व्यक्तीसह दोघांनी हल्ला करत त्यांना मारहाण केली व उत्तरपत्रिकेच्या गठ्ठ्यांवरती दगड टाकले. नंतर हे गुंड पळून गेले. 'आम्ही कॉप्या पुरवितो त्याचा तुम्हा शिक्षकांना काय त्रास होतो ?' अशा पद्धतीची भाषा या पवार व त्याच्या साथीदाराने वापरली. या व्यक्ती गेल्या काही वर्षापासून पाथर्डी शहरात कॉपी पुरवण्याचा धंदा करत आहेत व त्यातून पैसे कमवत आहेत, अशी माहिती आहे.
येथील कॉपी केंद्रांवर पोलिसांचा व शिक्षण विभागाचा काहीही धाक उरलेला नाही, हेही या प्रकरणातून पुन्हा समोर आले आहे. लोकमतने काळोखे यांच्याशी संपर्क साधला असता, आपणाला मारहाण झाली असून आपण तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.