लोकमत न्यूज नेटवर्क, अकोले (जि. अहिल्यानगर) : तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावाचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. संरक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२) पहाटे ही घटना घडली. जवान संदीप पांडुरंग गायकर हे भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत हाेते.
शनिवारी ब्राह्मणवाडा येथे अंत्यसंस्कार
गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये दहा जणांची तुकडी सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात जवान संदीप शहीद झाले. त्यांचे दोन सहकारीही गंभीर जखमी झाले आहेत.
शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शनिवारी (दि. २४) सकाळी दहा वाजता ब्राह्मणवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दीड वर्षाचा मुलगा, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील वांगदरी (ता. संगमनेर) येथे मामाच्या गावी स्थायिक झाले असून ते शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात.