जामखेडमध्ये थरार! हॉटेल कावेरीवर टोळक्याचा गोळीबार; मालकाच्या पायातून गोळी आरपार
By सुदाम देशमुख | Updated: December 18, 2025 18:28 IST2025-12-18T18:25:45+5:302025-12-18T18:28:05+5:30
अहिल्यानगरमध्ये हॉटेलची तोडफोड करत हॉटेल मालकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

जामखेडमध्ये थरार! हॉटेल कावेरीवर टोळक्याचा गोळीबार; मालकाच्या पायातून गोळी आरपार
Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या जामखेड बीड रस्त्याच्याकडेला असलेल्या हॉटेल कावेरी येथे काही टोळक्यांनी हॉटेलची तोडफोड करत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७ वर्षे) यांच्या पायाच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. ते गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच हॉटेल मालकाच्या चारचाकी वाहनाची तोडतोड करण्यात आली आहे. भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गोळीबार केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपी निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या जामखेड पोलीसांकडून सुरू आहे.
या बाबत पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री कावेरी हॉटेलवर हॉटेल मालक रोहीत अनिल पवार हा ग्राहकांना सेवा देत असताना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर येत हल्ला करीत हॉटेलची तोडफोड केली. तसेच हॉटेल मालक रोहीत अनिल पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो या घटनेत गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाची चारचाकी गाडीची तोडफोड केली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. आरोपी हल्ला करुन पळून गेल्यानंतर घटनास्थळाहुन जखमीस तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आजूबाजूचे काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता यामध्ये दोन संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. मागील भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अहिल्यानगर येथून फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. घटनास्थळी गावठी कट्ट्याचे अवशेष सापडले आहेत. याप्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनकडून सुरु आहे. सध्या जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली आहे.