कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेला १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:32+5:302021-01-08T05:04:32+5:30
कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाअंतर्गत २०२० -२१ या आर्थिक वर्षासाठी महाडीबीटी योजनेला १० जानेवारी २०२१ मुदतवाढ देण्यात ...

कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेला १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाअंतर्गत २०२० -२१ या आर्थिक वर्षासाठी महाडीबीटी योजनेला १० जानेवारी २०२१ मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत योजनेत सहभागी होता आले नाही. त्यांनी आता सहभाग घ्यावा, असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले आहे .
आढाव म्हणाले, राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित सर्व प्रकारची अवजारे, पॉवर टिलर ( छोटा ट्रॅक्टर) तसेच कांदा चाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण अशा विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइनपद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावयाचा आहे. ही नोंदणी करताना गावातील सेतू कार्यालयात अर्ज करता येते. या अर्जासाठी शेतकऱ्याने सातबारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक महत्वाचा आहे.
अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती या वर्गातील लाभार्थ्यांचा जातीचा दाखला आदी कागदपत्र आवश्यक आहे. या योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत या महिन्याच्या अखेरीस १० जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहनही आढाव यांनी केले आहे.