कामांसाठी द्यावी का, म्हणणे सादर करा, शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक
कामांसाठी द्यावी का, म्हणणे सादर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी मिळावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी महसूल विभागाला तीन आठवड्यांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतीने मागासवर्गीय व आदिवासी स्मशानभूमी, दशक्रियाविधी घाट, तसेच पाणीपुरवठा योजनेकरिता या जमिनीची मागणी केली आहे. २०१५ पासून त्याकरिता सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. प्रवरा नदीकाठावरील गट क्रमांक ५१ मधील ही जमीन काही खंडकरी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी घाट घातला जात आहे. शेतकऱ्यांना जमीन मिळावी, ही ग्रामस्थांची मागणी आहे.
ग्रामपंचायतीच्या विकास योजनांसाठी हे क्षेत्र मिळाल्यास त्याचा संपूर्ण गावाला लाभ होणार आहे. तसे ठरावही घेण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने सचिन बाबासाहेब तोरणे यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी शेती महामंडळ, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून तीन आठवड्यांत म्हणणे मागविले आहे. त्यानंतर सुनावणी घेतली जाणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अजित काळे, तर महामंडळाच्या वतीने पराग बरडे हे काम पाहत आहेत.
---------