अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर २५ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:20+5:302021-06-22T04:15:20+5:30

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो, बटाटे, दुधी भोपळा, फ्लाॅवर, कोबी, कोथिंबीर, भुईमुगाची शेंगाची चांगली आवक झाली आहे. ...

After the unlock, vegetable prices went up by 25 per cent | अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर २५ टक्क्यांनी वाढले

अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर २५ टक्क्यांनी वाढले

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो, बटाटे, दुधी भोपळा, फ्लाॅवर, कोबी, कोथिंबीर, भुईमुगाची शेंगाची चांगली आवक झाली आहे. त्या तुलनेत गवार, वांगी, घोसाळे, कारले, भेंडी, वाल, मेथी, पालक या भाज्यांची आवक कमी होती. त्यामुळे या भाज्यांचे दर वाढले आहेत. दर वाढले तरी शेतकऱ्यांच्याऐवजी विक्रेत्यांनाच जास्त फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

---------------

भाजीपाल्याचे ठोक दर (प्रतिकिलो )

भाजी १४ जून २० जून

टोमॅटो १० १०

बटाटे ११ १५

भेंडी २० ३५

मिरची २५ ३०

कारले ३० ३५

फ्लावर ८ ४०

वांगे ५ ४०

पालक ५ १०

-------------

पुन्हा वरणावर जोर

---------

आधी लॉकडाऊन होता म्हणून भाज्या मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी जास्त वरणावरच जोर द्यावा लागला. आता अनलॉक आहे. मात्र, भाज्यांचे दर वाढले आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेले असताना आता भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे जीणे कठीण झाले आहे.

-शैला धावडे, माळीवाडा.

------------

चांगला पाऊस झाला आहे. सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे. त्यामुळे भाजीपाल्याचीही आवक होईल आणि भाजीपाला स्वस्त होईल, असे वाटत होते. मात्र, सध्या भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सामान्य लोक आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त आहेत. त्यात आता भाजीपालाही महागला आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे.

- मनीषा जोशी, भिस्तबाग नाका, सावेडी.

---------------

म्हणून वाढले दर..

सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाली की दर वाढतात. त्यात सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे. पाऊस नाही. त्यामुळे नव्या भाज्यांची आवक कमी आहे. उन्हाळी भाजीपाला आला संपला आहे. मेथी, दोडके, घोसाळे अशा भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत.

-नरेंद्र देशमुख, भाजीपाला विक्रेते.

-----------

पावसाळी वातावरण सुरू झाले आहे. मालही कमी येत आहे. फुलगळती, फळगळती आणि काही फळभाज्यांना कीडही लागते. त्यामुळे मालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. एकीकडे कमी आवक आणि दुसरीकडे अनलॉक झाल्यानंतर भाजीपाल्याला मागणी मात्र वाढली आहे.

-अंकुश सर्जेराव काळे, व्यापारी.

----------------

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

----

टोमॅटोचे उत्पादन यंदा शेतकऱ्यांनी चांगले घेतले आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र ठोक बाजारात शेतकऱ्यांना कवडीमोल किंमत दिली जाते. त्यामुळे नक्की काय सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्येच संभ्रम आहे.

-संकेल लाळगे, कृषिमित्र.

------------------

आता डाळिंबाचे चांगले उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांकडून ४० ते ५० रुपये किलोने घेतले जातात. मात्र, किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलोने विकली जात आहेत. शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक लाभ होत नाही. शेतकऱ्यांनी फक्त कष्ट घ्यायचे. त्यात उत्पादकांचे मरण आहे.

श्रीधर बेल्हेकर, शेतकरी.

---------

डमी -८३१- नेट फोटो

Web Title: After the unlock, vegetable prices went up by 25 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.