श्रीगोंदा तालुक्यात महसूलपाठोपाठ पोलिसांचेही छापा सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:40+5:302020-12-22T04:20:40+5:30
श्रीगोंदा : तालुक्यात विविध नदीपात्रांतील वाळू उपशावर छापा टाकण्याचे महसूल विभागाचे सत्र सुरूच आहे. त्यातच रविवारी सायंकाळी पोलीस प्रशासनानेही ...

श्रीगोंदा तालुक्यात महसूलपाठोपाठ पोलिसांचेही छापा सत्र
श्रीगोंदा : तालुक्यात विविध नदीपात्रांतील वाळू उपशावर छापा टाकण्याचे महसूल विभागाचे सत्र सुरूच आहे. त्यातच रविवारी सायंकाळी पोलीस प्रशासनानेही पेडगाव शिवारातील भीमा नदीपात्रात छापा टाकून अवैध वाळू उपसा करणाऱ्या १८ लाख रुपयांच्या दोन यांत्रिक फायबर बोटी व २ सेक्शन बोटी जप्त करून त्या उद्ध्वस्त केल्या. यासाठी जिलेटीनचा वापर करण्यात आला. या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
किशोर किसन ओव्हाळ (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या मालकीची एक फायबर व एक सेक्शन बोट व नविद मैनुद्दिन शेख (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) याच्या मालकीची एक फायबर व एक सेक्शन बोटी पोलिसांनी नष्ट केली. पोलीस आल्याचे कळताच बोटीमधून वाळू उपसा करणारे पसार झाले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध वाळू उपशाबाबत ग्रामस्थांकडून तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे सुचित केले. त्यामुळे स्थानिक महसूल व पोलीस पथकांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, प्रकाश मांडगे, संजय काळे, गोकुळ इंगवले, दादासाहेब टाके, किरण बोराडे यांनी केली. म्हसे शिवारातील घोड नदीपात्रात दोन दिवसांपूर्वी महसूलच्या पथकाने केलेल्या कारवाईत चार बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार यांनी स्वत: या कारवाईत लक्ष घातले होते. त्यानंतर आता पोलीस प्रशासनानेही कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईचे नदीपट्ट्यातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.