इमारतीच्या दुरवस्थेमुळे बाळांतिणींची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:09+5:302021-03-04T04:39:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: जुनी झालेली इमारत, अपुरे आरोग्यसेवक आणि विद्युतीकरणाकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील ...

इमारतीच्या दुरवस्थेमुळे बाळांतिणींची परवड
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: जुनी झालेली इमारत, अपुरे आरोग्यसेवक आणि विद्युतीकरणाकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची परवड सुरू आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून महिलांना पुढील सात दिवस रुग्णालयात काढावे लागत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेचे कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालय शहरासह जिल्ह्यात नावलौकिक आहे. नॉर्मल डिलेवरी व्हावी, म्हणून नातेवाईक महिलांना देशपांडे रुग्णालयात दाखल करतात. या रुग्णालयात दररोज १५ ते १६ प्रसूती होतात. नॉर्मल डिलेवरी झाल्यास ३, तर सिझरींग केल्यास ७ दिवस डॉक्टरांच्या निगरानीखाली महिलांना रुग्णालयात ठेवले जाते, त्यामुळे चिमुकल्यासह माता रुग्णालयात थांबतात. त्यांच्या सोबत नातेवाईकही असतात. नातेवाइकांना थांबण्याची सोय रुग्णालयात नाही, त्यामुळे कुणी पायरीवर, तर कुणी व्हरंड्यात ताटकळत बसलेले असतात. प्रसूती झालेल्या महिलांसाठी ७० खाटांची सोय आहे; पण इमारत जुनी झाल्याने बाथरुम, सांडासची दुरवस्था झाली आहे. याबाबत पालिकेकडून कोणत्याही उपाययाेजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णालयातही दुर्गंधी असून, स्वच्छता करता येत नाही.
देशपांडे रुग्णालयासमोरील रस्ता अरुंद आहे. त्यामुळे चारचाकीतून महिला प्रसूतीसाठी आल्यास वाहन प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यात बराच वेळ जातो. त्यात प्रवेशद्वारातच मोठा खड्डा खाेदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी उभी करता येईल, एवढीही जागा नाही. त्यामुळे चारचाकी कशी उभी करणार, असाही प्रश्न आहे. मार्गावरील अतिक्रमणे हाटविण्याची तसदीही महापालिकेचा अतिक्रमण विभाग घेत नाही. त्यामुळे नातेवाइकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
...
भूलतज्ज्ञांअभावी प्रसूतीत अडथळा
देशपांडे रुग्णालयात महिलांना प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर त्यांना सर्वप्रथम भूल द्यावी लागते. त्यासाठी महापालिकेच्या पॅनलवर काही डॉक्टरांची नियुक्ती केली गेली आहे; पण वेळेवर भुलतज्ज्ञ उपलब्ध होत नसल्याने महिलांना जिल्हा रुग्णालय व विळदघाटात पाठवावे लागते, असेही सांगण्यात आले.
...
कर्मचाऱ्याअभावी सोनोग्राफी बंद
प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची सोनोग्राफी करावी लागते. त्यासाठी पालिकेने हे यंत्रणही खरेदी केले. सोनोग्राफीसाठी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे; पण साप्ताहिक सुटी किंवा इतर कामांसाठी संबंधित कर्मचाऱ्याने रजा घेतल्यास हे यंत्रही बंद असते. तसा फलकच रुग्णालयात उभा करण्यात आला आहे.
....
सर्व तपासण्या, औषधे मोफत
महिलांनी प्रसूतीसाठी नाव नोंदणी केल्यानंतर अवश्य असलेल्या रक्त, लघवी, काविळ यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात येतात, तसेच प्रसूतीनंतर लागणारी औषधेही मोफत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
...
रोहित्र बसविले; पण ते सुरू केले नाही
रुग्णालयात विजेवर चालणारे उपकरणे आहेत, तसेच उन्हाळा असल्याने पंखे सुरू ठेवावे लागतात. वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होत असल्याने रुग्णालयाबाहेर नवीन रोहित्र बसविण्यात आले आहे; परंतु ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.
...
प्रसूतीसाठी आलेल्या महिल्यांच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येतात, तसेच प्रसूतीनंतर आवश्यकतेनुसार औषधे देण्यात येतात, तसेच मुलांना सर्व डोस मोफत दिले जात असून, महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून घरी सोडले जाते.
- डॉ. दीपमाला चव्हाण, वैद्यकीय अधिकारी
....
प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत; परंतु इमारत जुनी झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत असून, कर्मचारीही अपुरे आहेत. नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
- डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय अधिकारी.
रुग्णालयातील ४९ पदे रिक्त
वैद्यकीय आरोग्य-९, आरोग्यसेविका- १३, प्रयोगशाळा तंत्र-२, लिपिक- ४, आया-११, शिपाई-२, स्विपर-५
....
- मुलीला प्रसूतीसाठी दाखल केले आहे. तिच्यासोबत आले आहे; पण इथे बसण्याची सोय नाही; पण प्रसूतीसाठी चांगली सोय आहे.
- छबूबाई कदम, नातेवाईक.
....