नालंदा स्कूलमध्ये रंगणार एरोमॉडेलिंग कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:46+5:302021-02-05T06:41:46+5:30
अहमदनगर : विमानाचे कार्य नेमके कसे चालते, त्याचा शास्त्रीय आधार काय, अशा सर्व गोष्टींची मनोरंजनात्मक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी ...

नालंदा स्कूलमध्ये रंगणार एरोमॉडेलिंग कार्यशाळा
अहमदनगर : विमानाचे कार्य नेमके कसे चालते, त्याचा शास्त्रीय आधार काय, अशा सर्व गोष्टींची मनोरंजनात्मक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी नालंदा सेंटर ऑफ लर्निंगमार्फत नगर-सोलापूर रोडवरील वाळूंज परिसरातील नालंदा स्कूलमध्ये ७ फेब्रुवारीला एरो मॉडेलिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तिसरी ते आठवीच्या वर्गामधील सर्व शाळांतील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली मटेरियल वापरून प्रत्यक्ष विमान बनविण्याचे प्रात्यक्षिक मुलांना करता येणार आहे. तसेच या कार्यशाळेनिमित्त सर्वांना निसर्गाच्या सान्निध्यात वन भोजनाचाही आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती नालंदा स्कूलचे प्रशासकीय अधिकारी गौतम बहादुर्गे यांनी दिली.
कर्नल यशवंत बहादुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देणार्या नालंदा स्कूलमध्ये दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून एरोमॉडेलिंग कार्यशाळेचा अभिनव उपक्रम घेण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ काळे हे विद्यार्थ्यांना एरोप्लेन मॉडेल तयार करण्यास शिकविणार आहेत. विद्यार्थ्यांना यात फिजिकल किट पुरविण्यात येणार आहे. याशिवाय देशाच्या हवाई दलाच्या सेवेत असलेल्या फायटर प्लेनच्या मिनी मॉडेलची प्रात्यक्षिकेही पहायला मिळणार आहेत. सुखोई, राफाएल, या फायटर प्लेनच्या छोट्या मॉडेलव्दारे त्यांच्या चित्तथरारक हवाई कसरतील यावेळी सादर करण्यात येतील, अशी माहिती प्राचार्या हेदर डिसुजा यांनी दिली. नोंदणीसाठी ३ फेब्रुवारी ही अंतिम तारीख असून नोंदणीसाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वा. प्र.)