कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:48+5:302021-08-15T04:23:48+5:30
जामखेड : जागतिक आरोग्य संघटना, टास्क फोर्स, इंडियन मेडिकल असोसिएशनने येणारी तिसऱ्या लाट मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज
जामखेड : जागतिक आरोग्य संघटना, टास्क फोर्स, इंडियन मेडिकल असोसिएशनने येणारी तिसऱ्या लाट मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट, बेड, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता केली आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात आला असून तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज आहे. याचबरोबर कोरोनाच्या महामारीला न घाबरता सामोरे जाऊन नियमांचे पालन करून कोरोना हद्दपार करण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
जामखेड येथे कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील कोरोनाचा शनिवारी दुपारी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पातील डॉ. अरोळे कोविड सेंटरमध्ये जाऊन एक्स रे मशीन व प्रयोगशाळेचे उद्घाटन मुश्रीफ यांनी केले. यानंतर ग्रामीण रूग्णालयातील नवीन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन त्यांनी केले.
यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, पंचायत समिती सभापती राजश्री मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, युवक अध्यक्ष शरद शिंदे, महिला तालुकाध्यक्ष अंजली ढेपे आदी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, सध्या जिल्ह्यातील २५ टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. ते ७० टक्के होण्याची आवश्यकता आहे. रोहित पवार हे सक्षम आमदार असून ते मतदारसंघात विकासकामे व विविध योजना राबविण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
आमदार रोहित पवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील ७० टक्के लोकांची सेवा केली. १२ हजार रुग्ण बरे झाले. खासगी दवाखान्यातील खर्च पाहता जवळपास ५० कोटी रुपये कोरोनाबाधितांचे वाचले आहेत. या काळात कोरोनाबाधितांना सर्व प्रकारच्या सेवा डॉ. आरोळे कोविड सेंटर, जंबो कोविड सेंटर व कर्जत येथील जिल्हा उपरुग्णालयातून दिल्या गेल्या.