शाखा अभियंत्यावर होणार कारवाई

By Admin | Updated: June 28, 2014 01:11 IST2014-06-27T23:11:16+5:302014-06-28T01:11:25+5:30

अहमदनगर : शेवगाव, पाथर्डी योजनेत कामात हलगर्जीपणा करणारे शाखा अभियंता बबन खोसे यांचा कार्यभार काढण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Action will be taken on Branch Engineer | शाखा अभियंत्यावर होणार कारवाई

शाखा अभियंत्यावर होणार कारवाई

अहमदनगर : शेवगाव, पाथर्डी योजनेत कामात हलगर्जीपणा करणारे शाखा अभियंता बबन खोसे यांचा कार्यभार काढण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जलस्वराज्य टप्पा क्र . २ योजना नगर आणि पाथर्डी तालुक्यात वांबोरी चारीच्या कार्यक्षेत्रात राबविण्याची मागणी सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केली. ही मागणी मान्य करण्यात आली.
अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. सुरूवातीला जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर बुऱ्हाणनगर आणि ४४ गावे, मिरी- तिसगाव व २२ गावे, गळनिंब- शिरसगाव व १८ गावे, चांदा व ५ गावे या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील गावांच्या पाणी साठवण उंच टाकीजवळ वॉटर मीटर बसविण्यात येणार आहे. यासाठी ५५ लाख ६० हजार रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
जलस्वराज्य योजनेत मोठा निधी उपलब्ध आहे. या योजनेत ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गाव अथवा वाडीवस्ती आणि त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असल्यास ४० लाख रुपयांपर्यंत पाणी साठवण बंधारा बांधता येणार आहे. ही योजना वांबोरी चारीवर नगर आणि पाथर्डी तालुक्यात राबविण्याची सूचना सदस्य पाटील यांनी मांडली. त्यास समितीने मान्यता दिली.
जिल्ह्यात असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजना येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाला देण्यात आल्या. जिल्ह्यात संभाव्य दुष्काळा बाबत चर्चा झाली. यात जनावरांना चारा आणि छावण्या सुरू करण्याबाबत काही सदस्यांकडून सूचना करण्यात आल्या.
शेवगाव, पाथर्डी पाणी योजनेच्या कामात कुचराई करणारे, योजना असणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात शुध्द पाणी देऊ न शकणारे शाखा अभियंता यांच्याबाबत बैठकीत चर्चा झाली. खोले यांच्या तक्रारींची दखल घेत त्यांच्याकडील कार्यभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, हर्षदा काकडे, शाहूराव घुटे, बाबासाहेब तांबे, सदस्य पाटील, सुदाम पवार, कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Action will be taken on Branch Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.