संगमनेरात चार जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 17:54 IST2018-03-04T12:31:50+5:302018-03-04T17:54:34+5:30
तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी परिसरातील एका घरात चार चोरट्यांनी चोरी करीत एका पुरूषाला मारहाण केली होती. चोरी करून डोंगराआड लपून बसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

संगमनेरात चार जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई
संगमनेर : तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी परिसरातील एका घरात चार चोरट्यांनी चोरी करीत एका पुरूषाला मारहाण केली होती. चोरी करून डोंगराआड लपून बसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चोरीची घटना २५ डिसेंबर २०१७ रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली होती. या चारही चोरट्यांविरोधात शुक्रवारी (२ मार्च) महाराष्ट संघटीत गुन्हेगारी कायदान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या कायदान्वये तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी सांगितले.
संतोष शिवाजी जाधव (वय २६, रा. आभाळवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर), संदेश दत्तू धांडे (वय ३०, रा. कोंडेगव्हाण, ता. श्रींगोदा, जि. अ. नगर), चंदर दादाभाऊ गाडे (वय २९, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अ. नगर ), शरद बन्सी निचीत (वय २१, रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे) अशी चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेले भाऊसाहेब भिमाजी जाधव (मुंजेवाडी, अकलापूर, ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अकलापूर, मुंजेवाडी परिसरातील मुगदरा येथे भाऊसाहेब जाधव यांच्या घरात चोरट्यांनी चोरी करीत त्यांना मारहाण केली होती. चोरी करून डोंगरावर लपून बसलेल्या या चारही चोरट्यांना मंगळवारी २६ डिसेंबर २०१७ रोजी ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चोरट्यांकडून पोलिसांनी एअरगन, तलवार, कोयता ही हत्यारे व मिरचीपूड जप्त केली होती. या गुन्हाबरोबरच इतर अनेक चोरीच्या गुन्ह्यांतही त्यांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले. या नंतर या चारही जणांविरोधात महाराष्टÑ संघटीत गुन्हेगारी कायदान्वये कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याकडे सादर करण्यात आला. यावर त्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात यांनी सांगितले.