श्रीरामपुरातील दुकानांवरील कारवाई मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:24+5:302021-08-12T04:25:24+5:30
कोविड नियमांचे उल्लंघन करीत सायंकाळी चार वाजल्यानंतर सुरू असलेल्या या दुकानांवर पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत ती सील ...

श्रीरामपुरातील दुकानांवरील कारवाई मागे
कोविड नियमांचे उल्लंघन करीत सायंकाळी चार वाजल्यानंतर सुरू असलेल्या या दुकानांवर पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत ती सील केली होती. शनिवारी सर्व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार लहू कानडे यांची भेट घेत कारवाई मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. आमदार कानडे यांनी त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत सरसकट कारवाई करण्याऐवजी व्यापाऱ्यांना समज देऊन त्यांना एक संधी द्यावी अशी विनंती केली होती. याबाबतचा निर्णय सोमवारी संध्याकाळी घेऊ असे प्रशासनाने सांगितल्याने आमदार कानडे यांनी व्यापारी बांधवांना तसे आश्वासन दिले होते.
सोमवार अखेरपर्यंत दुकानांवरील कारवाई मागे घेण्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने मंगळवारी आमदार कानडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. सील केलेली दुकाने साधकबाधक विचार करून खुली करण्याबाबत आग्रहाची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना फोन करून कानडे यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन तातडीने आजच कार्यवाही करावी असे आदेश दिले.
माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोफळे, राहुल मुथा, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, निलेश ओझा व इतर व्यापारी तसेच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे यांनी प्रांताधिकारी पवार यांना भेटून या विषयावर चर्चा केली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले. प्रांत कार्यालय येथे काँग्रेसचे विलास थोरात, सतीश बोर्डे, राजेंद्र औताड, जयेश खर्डे उपस्थित होते.