लाभार्थ्यांची यादी न लावणार्यांवर कारवाई
By Admin | Updated: June 3, 2014 00:26 IST2014-06-02T23:30:35+5:302014-06-03T00:26:34+5:30
अहमदनगर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य घेऊन जाणार्या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी दर महिन्याला लावणे बंधनकारक आहे.
लाभार्थ्यांची यादी न लावणार्यांवर कारवाई
अहमदनगर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य घेऊन जाणार्या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी दर महिन्याला लावणे बंधनकारक आहे. ती यादी न लावणार्या दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिला. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, प्रकाश भोसले, राजाराम जठार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे यांनी प्रारंभी जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा आढावा घेतला. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात लाभार्थी निवडण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अन्न सुरक्षा योजना ही गरिबांच्या तोंडी घास पडावा, या सद्हेतूने सुरु करण्यात आली आहे. तथापि, यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांची नावे असल्याच्या तक्रारी आहेत. वास्तविक या योजनेतील लाभार्थी ग्रामसभेने निवडलेले असतात. गावातील लोकांना कोण गरीब आहेत, कोण श्रीमंत आहे, हे माहिती असते, असे असतांना खरे लाभार्थी वंचित राहून खोट्या लाभार्थींची नावे समाविष्ट होणे चुकीचे आहे. गावकर्यांनी असे खोटे लाभार्थी यादीतून वगळण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते, असे अन्नधान्य घेऊन जाणार्या लाभार्थींची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी सूचना फलकावर लावावी, अशी यादी न लावल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या कामी ज्या यंत्रणांवर जबाबदारी आहे, त्यांनीही दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी कवडे यांनी स्पष्ट केले. गावाच्या प्रश्नाबाबत जागरुक असायला हवे, असेही कवडे म्हणाले. दारिद््रयरेषेखालील लाभार्थी, वैयक्तिक योजनांचे लाभार्थी निवडीबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही न करता काहीवेळेस बेकायदेशीररित्या निवड होते, गावकर्यांनी अशा बेकायदेशीर कृत्याला पाठिंबा देता कामा नये असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी पुरवठा विभागाची माहिती सादर केली. जिल्ह्यात १६३१ स्वस्त धान्य दुकाने, २२४१ किरकोळ केरोसिन परवानाधारक, ३६ केरोसिन घाऊक परवानाधारक कार्यरत आहेत. जिल्ह्यात ४० गॅस एजन्सी आहेत. जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत एकूण ३१ लाख ९५ हजार ६५१ लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. ३० लाख ५१ हजार १२५ लाभार्थी निवडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)