वाळू माफीयांविरोधात कारवाईची मोहीम

By Admin | Updated: October 29, 2014 23:57 IST2014-10-29T23:53:02+5:302014-10-29T23:57:54+5:30

अहमदनगर: जिल्ह्यातील वाळू माफीयांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून, महिनाभरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़

Action campaign against sand mafia | वाळू माफीयांविरोधात कारवाईची मोहीम

वाळू माफीयांविरोधात कारवाईची मोहीम

अहमदनगर: जिल्ह्यातील वाळू माफीयांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून, महिनाभरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ इतर गौण खणिज चोरी प्रकरणी आठ वाहनांवरही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़
जिल्ह्यातील वाळूचे लिलाव अद्याप झालेले नाहीत़ याविषयीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महसूल खात्याकडे पाठविला आहे़ मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी आहे़ असे असले तरी नियम धाब्यावर बसवून सर्रास वाळू उपसा सुरू आहे़ नदीपात्रात वाहने उतरवून वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस आले़ नदी पात्र परिसरातील नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाळू माफीयांविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे़ प्रशासनाच्या अहवालानुसार गत सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून २२ वाहने पकडण्यात आली आहेत़
प्रशासनाने पकडलेल्या वाहनांची संख्या ४५१ झाली़ इतर मुरुम व खडीचे डंपरही पकडण्यात आले असून, दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ त्यामुळे वाळू चोरी प्रकरणांना आळा बसला असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़
नदी पात्रातील वाळू उपसून ती शहरात आणून विकली जात आहे़ वाळू चोरी करणारे मोठे रॅकेटच जिल्ह्यात कार्यरत आहेत़ नदी पात्र कोरडे पडले आहेत़ त्यामुळे वाळूचा सर्रास उपसा केला जात आहे़ ही वाळू शहरात आणून विकली जाते़ मात्र याकडे पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे़
वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस खात्यास करण्यात आल्या़ परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीतून मोकळीक मिळाल्याने जिल्हा प्रशासनानेच कारवाईची मोहीम उघडली असून, चालू महिन्यांत जिल्हाभर कारवाई करण्यात आली आहे़या पुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़
(प्रतिनिधी)

Web Title: Action campaign against sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.