नगर तालुक्यात गावठी दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:53+5:302021-07-21T04:15:53+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील वाळकी, साकत, खडकी, निमगाव वाघा, नेप्ती या ठिकाणी सुरू असणाऱ्या गावठी दारू अड्ड्यांवर तालुका पोलीस ...

नगर तालुक्यात गावठी दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई
केडगाव : नगर तालुक्यातील वाळकी, साकत, खडकी, निमगाव वाघा, नेप्ती या ठिकाणी सुरू असणाऱ्या गावठी दारू अड्ड्यांवर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने मोठी कारवाई केली. दारू भट्ट्या उदध्वस्त करत लाखो रुपयांची दारू नष्ट केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळकी येथील धोंडेवाडी शिवारात असणाऱ्या हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत तीन हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले. पोलिसांना पाहताच संतोष दिलीप पवार पळून गेला. पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकत येथे सीना नदी परिसरात चार ठिकाणी चालू असलेल्या हातभट्ट्या उदध्वस्त करत दारू तयार करण्याचे १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले. याप्रकरणी दत्तू महिपती पवार, सोमनाथ नारायण पवार, राजू मौला पवार, अर्जुन मौला पवार (सर्व रा. साकत, ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकी शिवारात सुमन संजय पवार ही विनापरवाना तयार गावठी दारू विकताना पोलिसांना आढळून आली. २ हजार रुपये किमतीची २० लीटर गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निमगाव वाघा येथील पवार वस्ती शिवारात असणारा गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला. २४ हजार रुपये किमतीचे ४०० लीटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट करून सचिन नाथा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेप्ती येथील गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करत २ हजारांची २० लीटर दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी सुभाष रघुनाथ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पथकातील गांगर्डे, सोनवणे, कदम, शिंदे, लगड, विक्रांत भालसिंग यांनी ही कारवाई केली.