केंद्र शासनाच्या एनबीएस (न्युट्रीयंट बेसड सबसिडी) पॉलिसीनुसार युरिया खत (२६६ रुपये) वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचे अधिकार त्या त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली, असा दाखला देत एप्रिलनंतर काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खते, डीएपी, एसएसपी, एमओपी या खतांच्या किमतीत वाढ केली आहे. सद्यःस्थितीत बाजारात जुन्या दराची खते सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोणीवर छापलेल्या किमती तपासून आणि त्याप्रमाणेच रक्कम देऊन शेतकरी बांधवांनी खते खरेदी करावीत. छपाई किमतीपेक्षा जादा किमतीची आकारणी करता येत नाही.
रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दरांची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) त्याच दरात शेतकऱ्यांना विकणे खत विक्रेत्यांना बंधनकारक आहे. तसे निर्देश सर्व खतविक्रेत्यांना देण्यात आले आहेत. कुठलाही विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती यांना रीतसर तक्रार करावी किंवा जिल्हा स्तरावरील सनियंत्रण कक्षास ०२४१- २३५३६९३ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, अशा आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.