‘इबोला’च्या उपायांबाबत अबोला
By Admin | Updated: August 23, 2014 00:44 IST2014-08-21T23:41:20+5:302014-08-23T00:44:50+5:30
अहमदनगर : ‘इबोला’या विषाणूजन्य आजाराची माहिती सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आहे.

‘इबोला’च्या उपायांबाबत अबोला
अहमदनगर : ‘इबोला’या विषाणूजन्य आजाराची माहिती सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आहे. त्यामुळे हा आजार कोठून येणार, कुठे पसरणार याची विचारणा लोकांमधून सुरू झाली आहे. याबाबत खबरदारी घेण्याबाबत मात्र जिल्हा प्रशासनाने उदासीनता दाखविली आहे. इबोलाच्या संशयितांसाठी कोणताही कक्ष अद्याप स्थापन करण्यात आला नसून राज्य शासनाने तसे कोणतेही आदेश दिले नाहीत, असे जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. इबोला नगरमध्ये येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असाही दावा रुग्णालयाने केला आहे.
सुदानमधील इबोला नदीच्या काठावर वसलेल्या काँगो येथे ही साथ पहिल्यांदा आढळून आली. इबोला हा साथीचा रोग मध्य व पश्चिम अफ्रिकेतील दुर्गम खेड्यांमध्ये पसरला आहे. हा रोग मुख्यत्त्वे प्राण्यांना होतो, अपघाताने माणसांमध्ये या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या रोगाविषयी सोशल मीडियावरून जोरदार प्रसार झाला असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली
आहे.
चिकुनगुणिया, स्वाईन फ्ल्यू या आजारासारखीच या इबोला या साथीच्या रोगाची लक्षणे असल्याने नागरिकांमध्ये थोडी-फार भीती निर्माण झाली आहे. या रोगाची लक्षणे आढळून आली तर रूग्ण प्रथमत: रुग्ण जिल्हा रुग्णालयात धाव घेतो.
मात्र जिल्हा रुग्णालयात उपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच इबोला या साथीच्या आजाराविषयी प्रबोधन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार याबाबत कोणतीही हालचाल करण्यात आलेली दिसली नाही. या आजाराच्या संशयितांना तपासणी करण्यासाठी कोणताही कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही.
(प्रतिनिधी)