‘आधार कार्ड’ वयाचा पुरावा नाही

By Admin | Updated: January 31, 2016 23:31 IST2016-01-31T23:20:22+5:302016-01-31T23:31:37+5:30

अहमदनगर : विविध गुन्ह्यांमध्ये सध्या तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे.

'Aadhar card' is not proof of age | ‘आधार कार्ड’ वयाचा पुरावा नाही

‘आधार कार्ड’ वयाचा पुरावा नाही

अहमदनगर : विविध गुन्ह्यांमध्ये सध्या तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. तरुणांना अटक झाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी ते अल्पवयीन असल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपींचे वकील धडपड करतात. वय सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड कुचकामी ठरले असून शाळेचा दाखला हाच एकमेव पुरावा न्यायालयात ग्राह्य धरण्यात येत आहे. याचा अनुभव नुकताच एका प्रकरणात वकिलांना आणि पोलिसांनाही आला.
शहरातील तेलीखुंट येथे गेल्या रविवारी दगडफेक झाली होती. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी तीन जण अल्पवयीन असल्याने त्यांना सोडून देण्यात यावे, असा युक्तीवाद केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांच्या वयाचा पुरावा सादर करण्याचे वकिलांना सांगितले. त्यावेळी वकिलांनी तिन्ही संशयितांचे आधारकार्ड न्यायालयापुढे सादर केले. मात्र वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड देऊ नका, असे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी वकिलांना ठणकावले. वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ऐनवेळी संशयितांचे नातेवाईक आणि वकिलांची एकच तारांबळ उडाली. शाळेचा दाखला मिळविण्यासाठी नातेवाईकांची एकच धावपळ झाली. संशयितांना कोठडीत ठेवायचे की कारागृहात याचा निर्णय अधांतरी राहिला. त्यामुळे पोलिसांनाही आरोपींना नेमके ठेवायचे कुठे? असा प्रश्न पडला होता. दरम्यान संशयितांच्या नातेवाईकांनी शाळेमधून तातडीने सायंकाळी सहा वाजता दाखले उपलब्ध करुन ते न्यायालयात सादर केले. याच पुराव्यामुळे तिन्ही संशयितांचे वय १८ वर्षांच्या आत असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना जामीन झाला. आधार कार्ड ही सक्ती नाही, असा निर्वाळा यापुर्वीच सवौच्च न्यायालयाने दिला होता. तरीही स्थानिक पातळीवर त्याची गंभीर दखल न घेतल्याने ही तारांबळ उडाली.(प्रतिनिधी)

Web Title: 'Aadhar card' is not proof of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.