Ahilyanagar Crime: पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून महिलेने आयुष्याला पूर्णविराम दिला. पती कधी कुऱ्हाडीच्या दांड्याने मारायचा, कधी कोयता उगारायचा, तर कधी कधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायचा. सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात १४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कविता संतोष मुंगसे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा अजय संतोष मुंगसे (वय १८) याने फिर्याद दिली. मुंगसे कुटुंब राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील रहिवासी आहे.
मुलाने दिलेल्या तक्रारीमध्ये काय?
महिलेचा पती संतोष रामदास मुंगसे हा सतत दारू पिऊन पत्नी व मुलाला मारहाण करत असत. तसेच तो कत्ती तसेच घरातील कुऱ्हाड, कोयता हे हत्यार देखील अनेक वेळा मारहाणीत उगारायचा.
१३ जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान संतोष याने दारू पिऊन काही कारण नसताना पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास संतोष याने दारू पिऊन पत्नी कविता यांना मारहाण केली.
घरातून निघाली आणि शेतात घेतला गळफास
त्यावेळी त्या एकट्याच घरातून बाहेर निघून गेल्या व त्यांनी ब्राम्हणी शिवारातील शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पती संतोष हा गुपचूप कोणाला काही न सांगता पसार झाला होता. त्यानंतर पोलिस पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. या घटनेबाबत आरोपी पती संतोष रामदास मुंगसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.