पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या वाहनाला धडक
By शेखर पानसरे | Updated: August 30, 2024 23:03 IST2024-08-30T23:03:21+5:302024-08-30T23:03:33+5:30
कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील घटना ; दोन पोलीस जखमी

पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या वाहनाला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे लोणी येथून संगमनेर शहरात एका कार्यक्रमासाठी येत असताना शहर पोलीस ठाण्याचे वाहन आणि पालकमंत्री विखे-पाटील यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांचे वाहन यांच्यात धडक झाली. या अपघातत महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे दोन जण जखमी झाले.
एका कर्मचाऱ्याला किरकोळ मार लागला. हा अपघात शुक्रवारी ( दि.३०) रात्री नऊच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापुर येथील गणपती मंदिरासमोर घडला.
सहायक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. महसूल मंत्री विखे-पाटील हे लोणी येथून संगमनेर शहरात एका कार्यक्रमासाठी येत होते. त्यांच्या ताफ्यात मुख्य वाहनांसह, पोलिसांचे आणि कार्यकर्त्यांची अशी अनेक वाहने होती. दरम्यान रात्री नऊच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वाहन पुढील एका खासगी वाहनाला धडकले. यात सहायक पोलीस निरीक्षक फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल आगलावे यांना उपचारासाठी तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
महसूल मंत्री विखे-पाटील यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची रुग्णालयात येऊन भेट घेतली. यावेळी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन आदी यावेळी उपस्थित होते.