काळाने घात केला..! घरात टिव्ही पाहणाऱ्या माणसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

By सुदाम देशमुख | Updated: April 22, 2023 23:11 IST2023-04-22T23:11:10+5:302023-04-22T23:11:59+5:30

बिबट्याने घरात घुसून ६२ वर्षीय व्यक्तीला केले ठार; वडदरा (बोटा) येथील घटना

A man dead who was watching TV at home was fatally attacked by a leopard | काळाने घात केला..! घरात टिव्ही पाहणाऱ्या माणसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

काळाने घात केला..! घरात टिव्ही पाहणाऱ्या माणसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

घारगाव (जि. अहमदनगर) - संगमनेर तालुक्यातील  वडदरा (बोटा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय-६२ ) या व्यक्तीवर घरात घुसून बिबट्याने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यूू झाला. ही घटना शनिवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडली.

पठारभागात बिबट्याचे मानव वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बोटा-अकलापूर रोडवरील वडदरा येथे वास्तव्यास असलेले उत्तम कुऱ्हाडे घरात टीव्ही पाहत होते. घराचा दरवाजा उघडा असल्याने परिसरातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने काही कळायच्या आत त्यांच्यावर घरात घुसून हल्ला चढविला. मानेचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले. त्यांच्या आईने जोरजोरात आरडाओरड केल्याने मृतदेह टाकून बिबट्याने पळ काढला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.

दरम्यान , वनरक्षक डी.बी.कोरडे,एस.पी.सातपुते, वनसेवक बाळासाहेब वैराळ,आनंथा काळे यांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी या घटनेची माहिती घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असून रात्रीची शेतीची कामे कसे करायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. बिबट्याचा वावर पूर्वी होता मात्र, आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असून बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी संगमनेर पठारभाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: A man dead who was watching TV at home was fatally attacked by a leopard