कोरोनाबाबतचे नियम मोडणारांकडून ९० हजार वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST2021-02-26T04:28:06+5:302021-02-26T04:28:06+5:30
नेवासा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नेवासा पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले. विनामास्क, सोशल डिस्टन्स, सार्वजनिक ठिकाणी ...

कोरोनाबाबतचे नियम मोडणारांकडून ९० हजार वसूल
नेवासा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नेवासा पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले. विनामास्क, सोशल डिस्टन्स, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अवैध वाहतुकीविरोधात वाहतूक शाखेच्या पथकाने धडक मोहीम राबविली. या अंतर्गत मागील आठ दिवसात ७९९ जणांवर दंडात्मक कारवाई करून ९० हजारांचा दंड वसूल केला. पोलीस पथकाला नगरपंचायत कर्मचाऱ्यांनीही मदत केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने राज्य सरकार व प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने मागील आठ दिवसात नेवासा शहरासह प्रवरासंगम, कुकाणा, भेंडा, खडका फाटा येथील गर्दीच्या ठिकाणी व महामार्गावर विनामास्क असणाऱ्या ४९० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून ४९ हजारांचा दंड वसूल केला. सोशल डिस्टन्सच्या कारवाईत ५२ जणांकडून ५ हजार दोनशे रुपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३२ व्यक्तींना ३ हजार दोनशे रुपयांचा दंड करण्यात आला. नगरपंचायत व वाहतूक शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत विनामास्क असलेल्या १५० व्यक्तींकडून १५ हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवायांबरोबरच अवैध वाहतुकीच्या ७५ केसेस करण्यात आल्या असून यामध्ये तब्बल १८ हजार असे ७९९ व्यक्तींकडून ९० हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक राजू काळे, किरण गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गलधर सहभागी झाले होते.
---२५ नेवासा
नेवासा शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना वाहतूक शाखेचे कर्मचारी.