९ वर्षांची मुलगी घराजवळ लघुशंकेसाठी गेली, मात्र परतलीच नाही; बिबट्याने घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:37 IST2025-01-17T17:26:44+5:302025-01-17T17:37:01+5:30
घराच्या शेजारी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केला.

९ वर्षांची मुलगी घराजवळ लघुशंकेसाठी गेली, मात्र परतलीच नाही; बिबट्याने घेतला जीव
Leopard Attack: घराच्या जवळच लघुशंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा गुरुवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे ही घटना घडली. ईश्वरी पांडुरंग रोहकले असं मृत मुलीचे नाव आहे. ईश्वरीचे वडील पांडुरंग रोहकले गुरुवारी सायंकाळी सात वाजता घरासमोरील पडवीमध्ये जेवण करत होते. त्यावेळी मुलगी ईश्वरी हिने घराबाहेर लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगितले. त्याचवेळी घराच्या शेजारी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केला. तिला थेट मक्याच्या शेतामध्ये ओढत नेले. तिने आरडाओरड केली. पडवीत बसलेल्या वडिलांनी तिचा आवाज ऐकला. त्यांनी मक्याच्या शेतात बॅटरी लावून पाहिले. नरभक्षक बिबट्या तिच्याजवळ आढळून आला.
वडिलांनी बिबट्याचा प्रतिकार करत तिची सुटका केली. त्यानंतर बिबट्या पळून गेला. हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात मुलीची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. वनविभाग, पोलिस यांच्या वतीने संयुक्त पंचनामा करणार आहेत. घटनेची माहिती आमदार काशिनाथ दाते यांना कळताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रहाणे व स्थानिक पोलिसांना सूचना केल्या. तातडीने उपाययोजना करून पिंजरा लावण्याचीही सूचना केली.
नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा
दोन महिन्यांपासून खडकवाडी येथील गणपती मळा येथे बिबट्याचे पिलासह वास्तव्य आहे. या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी वनविभागाकडे लेखी तक्रारही केली. याच वस्तीवरील बबन रोहकले यांच्या मालकीच्या दोन मेंढ्यांवर बिबट्याने हल्लाही केला होता. याबाबत टाकळी ढोकेश्वर २ वनविभागाच्या वतीने पंचनामाही केला होता. त्यामुळे नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी विकास रोकडे, डॉ. विनायक दातीर, ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.