डोक्यात दगड घालून ८ वर्षीय मुलाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:08+5:302021-07-07T04:27:08+5:30

नेवासा : तालुक्यातील वरखेड येथे सोमवारी रात्री सोहम उत्तम खिलारे या आठवर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. ...

8-year-old boy brutally murdered by throwing stones at his head | डोक्यात दगड घालून ८ वर्षीय मुलाचा निर्घृण खून

डोक्यात दगड घालून ८ वर्षीय मुलाचा निर्घृण खून

नेवासा : तालुक्यातील वरखेड येथे सोमवारी रात्री सोहम उत्तम खिलारे या आठवर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.

वरखेडचे पोलीस पाटील संतोष घुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वरखेड गावामध्ये सीमा उत्तम खिलारे ही तिच्या तीन मुलांसह मागील सात वर्षांपासून वरखेडदेवी मंदिराजवळ राहते. तिच्या सोबत गवंडी काम करणारा समाधान महादू ब्राह्मणे हा राहतो. मंगळवारी सकाळी दत्तात्रय जगन्नाथ गोरे यांच्या शेताजवळील पाटामध्ये एक लहान मुलगा मृतावस्थेत पडलेला असल्याचे घुंगासे यांना समजले. ते तेथे गेले असता एक ८ वर्षीय मुलगा मृतावस्थेत दिसून आला. त्याचे डोके दगडाने ठेचलेले होते. तोंडावरून रक्त वाहिलेले होते. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेला दगड पडलेला होता.

घटनेची माहिती समजताच गावातील लोक तेथे जमा झाले. त्यावेळी समाधान ब्राह्मणे व सीमा खिलारे हेही त्या ठिकाणी आले व त्या मयत मुलास पाहून जोरजोरात रडू लागले. सीमा खिलारे यांच्याकडे चौकशी केली असता मयत मुलगा त्यांचा असून, त्याचे नाव सोहम असल्याचे सांगितले. सोहम हा सोमवारी (दि. ५) सायंकाळी ७ वाजेपासून खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तो घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला; परंतु तो कुठेही मिळून आला नसल्याचे सीमा खिलारे यांनी गावकऱ्यांना सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शेवगावचे उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनीही भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.

.........................

दोन संशयितांकडे चौकशी

या मुलाच्या हत्येबाबत नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना मंगळवारी रात्री उशिरा सोडून दिल्याचे तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: 8-year-old boy brutally murdered by throwing stones at his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.