राहाता तालुक्यातील वाळकीत ८ जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:18+5:302021-03-10T04:22:18+5:30
गेल्या आठ दिवसापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पथके गावातील जनावरांवर उपचार करत असून रोगाचे निदान झालेले नाही. शालिनी विखे यांनी ...

राहाता तालुक्यातील वाळकीत ८ जनावरे दगावली
गेल्या आठ दिवसापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पथके गावातील जनावरांवर उपचार करत असून रोगाचे निदान झालेले नाही. शालिनी विखे यांनी मंगळवारी वाळकीत जाऊन या बाधित जनावरांची पाहणी केली.
वाळकी गावात गेल्या आठ दिवसांपूर्वी काही दुभती जनावरे मृत झाली. उपचार करूनही उपयोग न झाल्याने रोज वेगवेगळ्या ठिकाणी ही जनावरे मृत झाली. याची दखल पशूवैद्यकीय विभागाने घेत नगर, राहाता, दहेगांव व शिर्डी येथील पशुवैद्यक विभागाची चार पथके उपचार करत आहेत. यातील आठ जनावरे मयत झाली असून १० हून अधिक बाधित असून त्यांच्यावर उपचार चालू आहे. मयत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचे खाद्य, पाणी व चाऱ्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे पथकातील डॉ. पवार यांनी सांगितले.
मच्छिंद्र शिरोळे, गंगाधर शिरोळे, भाऊसाहेब शिरोळे, प्रभाकर शिरोळे, बाळासाहेब शिरोळे या शेतकऱ्यांच्या ७ गायी व १ बैल मयत झाला आहे. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी वाळकीत भेट देऊन पाहणी केली. डॉ. एस. जी. बने, डॉ. आर. टी. पवार, प्रेरणा मुळूक, डॉ. नेहरकर हे डॉक्टर बाधित जनावरांवर उपचार करत आहे. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकांना एक दिवस वाळकीत काम करण्याच्या सूचना जिल्हा पशू संवर्धन अधिकारी तुंबारे यांनी दिल्या आहेत.