७२०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजूनही घेतली नाही लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:01+5:302021-07-21T04:16:01+5:30

चंद्रकांत शेळके अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. परंतु, या काळात ...

7200 health workers have not yet received the vaccine | ७२०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजूनही घेतली नाही लस

७२०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजूनही घेतली नाही लस

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. परंतु, या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य विभागाचे सुमारे सात हजारांहून अधिक कर्मचारी अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. त्यांनी अजून लसीचा एकही डोस घेतलेला नाही. उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी असताना तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, दुसरीकडे १०० टक्के फ्रंटलाइन वर्करने पहिला डोस पूर्ण केला आहे.

नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. कोरोना काळात महत्त्वाची भूमिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी निभावली. त्यामुळे प्रारंभी आरोग्य कर्मचाऱ्यांचेच लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्ह्यात एकूण ५२ हजार ४० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४४ हजार ८४० कर्मचाऱ्यांनी (८६ टक्के) पहिला डोस घेतला आहे, तर ३४ हजार ३८४ कर्मचाऱ्यांनी (६६ टक्के) दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण मोहीम सुरू होऊन आता सहा महिने लोटले असले तरी अजूनही ७ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही. तिसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांनीच लस न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, ५८ हजार ९९१ फ्रंटलाइन वर्करला लसीकरणाचे उद्दिष्ट होते. पैकी १०० टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर २५ हजार १८० (४३ टक्के) लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. अजूनही ५७ टक्के फ्रंटलाइनवरील कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देणे बाकी आहे.

-------------

एकूण हेल्थ केअर वर्कर्स - ५२,०४०

पहिला डोस किती जणांनी घेतला? - ४४,८४०

दोन्ही डोस घेणारे - ३४,३८४

एकही डोस न घेतलेले - ७,२००

---------------

फ्रंटलाइन वर्कर्स - ५८,९९१

पहिला डोस किती जणांनी घेतला? - ५८,९९१

दोन्ही डोस घेणारे - २५,१८०

एकही डोस न घेतलेले - ०

-----------------

लसीकरणाबाबत उदासीनता का?

मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरात असताना लसीकरणासाठी नागरिक रांगा लावत होते. परंतु, पुढे कोरोनाचे रुग्ण कमी झाले, तसे लसीकरण मोहीमही काहीशी थंडावली. त्यामुळे मध्यंतरी अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. परंतु, पुन्हा १८ वर्षांवरील लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरण केंद्रावर रांगा लागत आहेत.

---------------

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण जवळपास होत आले आहे. तांत्रिक अडचणींमुळे कागदोपत्री ते कमी दिसत असेल. मात्र, आम्ही प्राधान्याने आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण करून घेत आहोत.

- डाॅ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: 7200 health workers have not yet received the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.