काजूच्या पोत्याखाली सापडली ७१ लाखांची विदेशी दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:36+5:302021-04-18T04:20:36+5:30
या कारवाईत एकूण ८६ लाख ४७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस ...

काजूच्या पोत्याखाली सापडली ७१ लाखांची विदेशी दारू
या कारवाईत एकूण ८६ लाख ४७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या दारूची पुणे-नाशिक महामार्गाने वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार, नगर व पुणेच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या सापळा लावून ट्रक ताब्यात घेतला. ट्रकमध्ये वर काजूच्या बियाने भरलेल्या गोण्या ठेवल्या होत्या. पथकातील अधिकाऱ्यांनी या गोण्या हटवून तपासणी केली असता आतमध्ये विदेशी दारूचे बॉक्स होते. गोवा येथून ही दारू गुजरात येथे नेण्यात येत होती. या ट्रकमधून रॉयल चॅलेंज व्हिस्की, व्होडका, किंग फिशर बियर अशा विविध कंपनीच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. यावेळी भारतसिंग बापूलाल प्रजापती (वय ३२, रा. गादियामेर, जि. राजगड, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली. यावेळी एक जण फरार झाला. अधिकाऱ्यांनी ट्रकचालकाची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे कोल्हापूर येथून काजू बिया खरेदी करून त्या नाशिक येथे नेण्यात येत असल्याचे बिल आढळून आले. प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये दारूची वाहतूक केली जात होती.
उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक आर. डी. वाजे, एस. एस. पाडळे, बिराजदार, पुणे येथील भरारी पथकातील निरीक्षक एन. सी. परते, दुय्यम निरीक्षक पातळे, विकास थोरात ए. जे. यादव, पी. एस. कडभाने, डी. वाय. गोलेकर, नेहाल उके, दीपक बर्डे, एस. एम. मुजमुले, एस. डी. साठे, विजय मेहेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील हे अधिक तपास करीत आहेत.