संगमनेरची १३ महिन्यांची चिमुकली अन् नगरच्या ७० वर्षाच्या आजीबाईनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:34 IST2020-06-12T13:45:01+5:302020-06-12T15:34:04+5:30
शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या शुक्रवारी बरे होऊन घरी परतल्या आहेत.

संगमनेरची १३ महिन्यांची चिमुकली अन् नगरच्या ७० वर्षाच्या आजीबाईनी केली कोरोनावर मात
अहमदनगर : शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या शुक्रवारी बरे होऊन घरी परतल्या आहेत.
तर संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथील एक १३ महिन्याची चिमुकलीही कोरोनावर मात करीत पुन्हा सुखरूप घरी परतली आहे.
या दोघी सोबतच एकूण १९ रुग्ण शुकवारी कोरोनातून बरे झाले. बूथ हॉस्पिटलमधून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप दिला. पुढील चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या.
या आजीबाईंच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाने गाठले. तो त्यांच्यामार्फत आजीबाईपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथेही त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला.
मनाचा ठाम निग्रह ठेवत त्यांनी आता या आजारावर मात केली आहे. या आजीबाईसोबत संगमनेर येथील ही चिमुकली बरी झाली. तिलाही तिच्या कुटुंबातील सदस्यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग झाला. तिने डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद दिला आणि तिही या आजारातून बरी होऊन आज घरी परतली.