शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी रयतचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST2021-08-29T04:22:56+5:302021-08-29T04:22:56+5:30

सुपा : राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यासाठी असणाऱ्या कोट्यापैकी रयत शिक्षण संस्थेचे ७० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले ...

70% of the students in the district are Rayat in the scholarship examination | शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी रयतचे

शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी रयतचे

सुपा : राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यासाठी असणाऱ्या कोट्यापैकी रयत शिक्षण संस्थेचे ७० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत व त्यांना नववी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी कार्यालयाकडून मिळाली. तर रयत शिक्षण संस्थेच्या सर्व विभागात नगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नगर जिल्ह्यासाठी ५४१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा कोटा निर्धारित करण्यात आला असून त्यासाठी गुणवत्तेवर आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यावर्षी शिष्यवृत्तीसाठी पात्र ५४१ विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील ३६० विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील असल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय निरीक्षक टी. पी. कण्हेरकर यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी व नावलौकिक मिळवलेली संस्था असून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या शिक्षण महर्षींच्या त्यागातून व परिश्रमातून ही संस्था उभी राहिली आहे. रयतच्या उत्तर विभागात अहमदनगरसह बीड, नाशिक या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश असून विभागातील ४६६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास प्रति वर्षी १२ हजार रुपये मिळणार असल्याने व ते बारावीपर्यंत त्याला दिले जाणार असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ४८ हजार रुपये मिळतील. यातून त्याच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद होणार असल्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले.

ज्या शाळांमधील एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाला नाही, अशा शाळांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यामागच्या कारणांचा शोध घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना कळमकर यांनी विभागीय अधिकाऱ्यांना सुपा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या भेटीत दिली आहे.

....................

स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधून कोरोना काळात शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात असून स्वाध्याय, गृहभेटी आदी उपक्रमांमुळे विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेपासून दुरावला जाऊ नये याची काळजी घेतली. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले जातात.

-टी. पी. कण्हेरकर, विभागीय निरीक्षक, रयत शिक्षण संस्था

Web Title: 70% of the students in the district are Rayat in the scholarship examination