‘स्व’ निधीतून साकारले ६३ किलोमीटरचे रस्ते

By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-27T23:17:42+5:302014-07-28T00:51:38+5:30

नेवासा : पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात अनेक गावात रस्त्यांचा प्रश्न गंभीर होत असतो. मात्र, ऐनवेळी शासकीय पातळीवर लालफितीच्या कारभारामुळे अडचणी निर्माण होतात.

63 kilometers of roads self funded | ‘स्व’ निधीतून साकारले ६३ किलोमीटरचे रस्ते

‘स्व’ निधीतून साकारले ६३ किलोमीटरचे रस्ते

नेवासा : पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात अनेक गावात रस्त्यांचा प्रश्न गंभीर होत असतो. मात्र, ऐनवेळी शासकीय पातळीवर लालफितीच्या कारभारामुळे अडचणी निर्माण होतात. मात्र, यावर मात करत नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील वाड्यावस्त्यावर स्वत:ची यंत्रणा कामाला लावत सुमारे ६३ किलोमीटरचे रस्ते स्वनिधीतून पूर्ण करून घेतले.
विकासाचा राज्य मार्ग रस्त्यावरून जातो. रस्ते या विकासाच्या धमण्या आहेत. शहराशी खेड्यांचा चांगला संपर्क असेल तर त्यांची प्रगती होईल, ही खूणगाठ आ. गडाख यांनी आपल्या मनात बांधून ठेवलेली होती. अनेक कार्यक्रमात त्यांनी हे बोलून दाखविले होते. नेवासा तालुक्यात १२१ गावांपैकी सुमारे ८० गावे ही ग्रामीण म्हणून ओळखली जातात. या गावात धरणग्रस्त, पूरग्रस्त गावेही आहेत. पाच वर्षापूर्वी या गावात पावसाळ्यात जाणे कठीण काम होते. यामुळे आमदारकीच्या पहिल्याच वर्षात गडाख यांनी या गावांच्या विकासाला सुरूवात केली. यातील काही प्रश्न निकाली निघाले असले तरी काही ठिकाणी दळणवळणाचा प्रश्न बाकी आहे. मतदारसंघातील नेहमीच्या दौऱ्यात रस्त्यांचे प्रश्न पुढे येत असल्याने गडाख यांनी रस्त्यांच्या कामात लक्ष घालण्यास सुरूवात केली. दळणवळणासाठी रस्ते नसल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल, खेड्यातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटेल. प्राथमिक शाळातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे हाल होतील हे ओळखून गडाख यांनी काम करण्याचा निर्णय घेतला.
नेवासा तालुक्यात बाजार समिती ही मोठी संस्था आहे. ग्रामीण भागातून शेतकरी या ठिकाणी आपला माल विक्रीसाठी आणतो. मात्र, पावसाळ्यात मागणी आणि चांगला भाव असतांनाही केवळ रस्त्याअभावी बाजारपेठेपर्यंत शेतमाल पोहचू शकला नसता. या सर्व गोष्टी आमदारांच्या पुढे आल्या आणि त्यांनी तातडीने निर्णय घेतला.
हा प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वत: च्या यंत्रणे मार्फत पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्याचा दौरा करून आवश्यकतेनुसार रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरणाची कामे हाती घेण्यात आली. गेल्या २५ दिवसांत तालुक्यातील ६२ किलोमीटर ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत. तालुक्यात १७० किलोमीटर रस्त्यांची कामे होणे आवश्यक होते. मात्र, हे करणे शासकीय यंत्रणेच्या पलीकडे असल्याने स्वत:च्या यंत्रणेच्या माध्यमातून विकासाला सुरूवात करण्यात आली.
(तालुका प्रतिनिधी)
गडाख मित्रमंडळाकडून वाहने उपलब्ध
नेवासा तालुक्यातील रस्त्यांची कामे झाल्याने शेतकरी, दूध व्यवसायीक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे. शिल्लक राहणाऱ्या रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आमदार गडाख मित्र मंडळाच्यावतीने यासाठी आठ जेसीबी यंत्रे, बारा डंपर, दहा ट्रॅक्टर, दोन रोलर व पाण्यासाठी चार वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्रणेला मोठा पाऊस सुरू होण्यापूर्वी आणखीन १७ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यायचे आहे.
स्व निधीतील या रस्ते विकास कामांत ज्या ठिकाणी तक्रारी नाहीत, त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच उर्वरित ठिकाणी तक्रारीतून मार्ग काढून कामे पूर्ण करून घेण्यात येत आहे. अनेक ठिकाणी स्वत: आ. गडाख यांनी पुढाकार घेत वाद मिटवून दळणवळणाचे महत्व पटवून दिले आहे.

Web Title: 63 kilometers of roads self funded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.