६२ कामगारांना पगारवाढ
By Admin | Updated: July 14, 2014 00:56 IST2014-07-14T00:28:57+5:302014-07-14T00:56:42+5:30
अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील एक्साईड बॅटरी कंपनी व्यवस्थापन व ६२ कामगारांत तीन वर्षासाठीचा करार कामगार कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत झाला़

६२ कामगारांना पगारवाढ
अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील एक्साईड बॅटरी कंपनी व्यवस्थापन व ६२ कामगारांत तीन वर्षासाठीचा करार कामगार कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत झाला़ या करारामुळे कामगारांना २२ हजार इतका पगार मिळणार असून, आतापर्यंतचा सर्वाधिक पगार देणारा हा पहिलाच करार असल्याचे सांगण्यात आले आहे़ त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़
कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात हा करार झाला़ कंपनीचे दिल्ली येथील प्रतिनिधी कुशल बॅनर्जी, तपनकार, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, किरण दाभाडे, दत्ता तपकिरे, सुनील कदम, बाबासाहेब गायकवाड, अजय पाटे, संजय गिरी आदी उपस्थित होते़या कराराचा लाभ कंपनीतील ६२ कामगारांना होणार असून, त्यांना प्रत्येकी २२ हजार ३१९ रुपये पगार मिळणार आहे़ वसाहतीतील सर्वात मोठा हा करार असून, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे़ त्यामुळे हा करार करणे शक्य झाले असल्याचे सांगण्यात आले़
औद्योगिक वसाहतीतील एक्साईड कंपनी व्यवस्थापनाकडे स्वराज्य कामगार संघटनेकडून कामगारांना शासनाच्या नियमानुसार पगार देण्याची मागणी केली होती़ संघटनेकडून करण्यात आलेल्या विविध मागण्यांची दखल घेऊन कंपनी व्यवस्थापनाने हा करार करण्याची तयारी दर्शविली़ कामगारांच्या विविध मागण्या मान्य करत व्यवस्थापनाने ६२ कामगारांशी तीन वर्षासाठीचा हा करार केला़ कामगारांना यामुळे शासन नियमानुसार सुविधा मिळणार आहेत़ आरोग्य विमा योजना कामगारांना लागू होणार आहे़दिवाळीसाठी २० टक्के बोनस, कॅन्टीन यासारख्या सुविधा कामगारांना मिळणार आहेत़ (प्रतिनिधी)
कंपनीचा विस्तार करणार
एमआयडीसीत कामगारांना एवढा मोठा पगार देणारी एक्साईड ही पहिली कंपनी ठरली आहे़ कंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत सहकार्याची भूमिका घेतल्यामुळेच हा करार झाला़ या करारामुळे कामगारांचा आर्थिक फायदा झाला असून, त्यांना शासन नियमानुसार पगार मिळणार आहे़
-कामगार आयुक्त
एक्साईड कंपनी व कामगारांत हा करार झाला आहे़ तो तीन वर्षांसाठी असणार आहे़ यामध्ये कामगारांना उत्तम पगार आणि सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ तसेच कंपनीचा विस्तार करण्यात येणार असून, त्यादृष्टीने बांधकाम सुरू करण्यात येणार आहे़
-तपनकार, प्रोडक्शन मॅनेजर, एक्साईड कंपनी