५०० ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प
By Admin | Updated: July 8, 2014 00:30 IST2014-07-07T23:28:46+5:302014-07-08T00:30:22+5:30
अहमदनगर : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झालेले आहे.

५०० ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प
अहमदनगर : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झालेले आहे. दरम्यान, या ठिकाणी आंदोलनात सहभागी नसणाऱ्या ग्रामसेवकांकडे अतिरिक्त पदभार देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या आहेत.
‘नरेगा’चे काम अन्य यंत्रणेकडे द्यावे, ग्रामसेवकांची वेतनश्रेणी वाढविण्यात यावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ निश्चित करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने १ जुलैपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे.
आंदोलन सुरू असले तरी पाणी पुरवठ्याचे काम सुरू राहणार असल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आंदोलन काळात केवळ विकास कामे, शासकीय दाखले आणि नरेगाची कामे थांबविण्यात आली असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. जिल्ह्यात १ हजार ११२ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. यातील ५०० ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झालेले आहेत. यामुळे त्या ग्रामपंचायतींचे काम ठप्प झालेले आहे.
दरम्यान, युनियनच्या वतीने मुंबईत आझाद मैदानात विभागनिहाय साखळी उपोषण सुरू आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)