पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी ५ मित्र गेले; पण घात झाला, एकाचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:07 IST2025-01-10T19:06:59+5:302025-01-10T19:07:09+5:30
काही अंतरावर पाटाच्या पाण्यात त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी ५ मित्र गेले; पण घात झाला, एकाचा मृत्यू!
Ahilyanagar: राहुरी विद्यापीठ परिसरात मुळा उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी पोहता येत नसल्याने पाण्यात संकेत तरटे बुडाले. आरडाओरड झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी एका विद्यार्थ्यास वाचवले पण दुसरा विद्यार्थी वाहून गेल्याने तो सापडला नाही. बुधवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास शोध मोहिम राबवली होती. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी काही अंतरावर पाटाच्या पाण्यात त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. संकेत श्रीपती तरटे (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
राहुरी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या दहावीतील संकेत तरटे, ओम जगदाळे, युवराज मोरे, तेजस कांदे तसेच आणखी एक असे पाच विद्यार्थी बुधवारी शाळेत जाण्याऐवजी विद्यापीठ परिसरातील पाटात पोहायला गेले. सायंकाळी चारच्यादरम्यान संकेत श्रीपती तरटे (रा. राहुरी) व तेजस कांदे (रा. डिग्रस) हे दोघे कपडे काढून पाटाच्या पाण्यात उतरले. त्यांना पोहता येत नसल्याने संकेत तरटे हा पाण्यात बुडून वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा देखील पाण्यात बुडायला लागला. यावेळी त्याने आरडाओरडा केला. पाटाजवळच राहणारे प्रशांत गावडे, भानुदास रोडे, अजय गावडे या तरुणांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी पाण्यामध्ये उडी मारून बुडत असलेल्या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना तेजस कांदे याला वाचविण्यात यश आले. त्याला ताबडतोब अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संकेत तरटे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व सुरक्षारक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पाटबंधारे अधिकारी सायली पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुळा उजवा कालव्याचे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला.
दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी डिग्रस येथील एका तरुणाला घटनास्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर पाटाच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला. परिसरातील राहुल गायकवाड, म्हाळु हळोनोर, अविनाश भिंगारदे, सोनू कोकाटे, अक्षय गोसावी या तरुणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.