जिल्ह्यात आढळले ४६५ शाळाबाह्य विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:52+5:302021-04-30T04:25:52+5:30
राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोधमोहीम ...

जिल्ह्यात आढळले ४६५ शाळाबाह्य विद्यार्थी
राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी वीटभट्टी, रेल्वे स्टेशन, प्रत्येक गावातील गजबजलेल्या वस्त्या, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, बाजारतळ, बांधकाम व्यवसायातील कामगार, तसेच रस्त्यावर राहणारे कुटुंब अशा ठिकाणी भेटी देऊन ६ ते १४ वयोगटातील बालके ज्यांनी अद्याप शाळेत नाव दाखल केले नाही किंवा ज्यांची शाळेतील अनुपस्थिती एक महिन्यापेक्षा जास्त आहे अशा बालकांचा शोध घेतला. नगर जिल्ह्यामध्ये अशी एकूण ४६३ बालके आढळली आहेत. त्यामध्ये १४१ बालके कधीच शाळेत गेले नाहीत, तर ३२२ बालकांची शाळेतील हजेरी अनियमित आहे.
------------
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे किंवा शाळेत दाखल करणे आणि त्याला प्राथमिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. अशा वयोगटातील मुले ज्यांनी अद्याप शाळेत नाव दाखल केले नाही किंवा त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले नाही किंवा एक महिन्यापेक्षा अधिक काळ शाळेत अनुपस्थित आहेत अशा मुलांना शाळाबाह्य बालके संबोधले जाते. शिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी अशा विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवून त्यांना शाळेत दाखल केले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे शाळा बंद असल्याने केवळ या विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना शाळेत पाठवले जाईल.