जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाखांचे पाइप चोरीला, संगमनेर तालुक्यातील दुसरी घटना
By शेखर पानसरे | Updated: August 10, 2023 17:31 IST2023-08-10T17:30:36+5:302023-08-10T17:31:55+5:30
अभियंता सचिन शरद रेवगडे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाखांचे पाइप चोरीला, संगमनेर तालुक्यातील दुसरी घटना
तळेगाव दिघे : पाण्याच्या टाकीच्या कम्पाउंडमध्ये ठेवलेले जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाख ०५ हजार ५२३ रुपये किमतीचे पाइप चोरीला गेले आहेत. संगमनेर तालुक्याच्या तिगाव शिवारात ही घटना घडली असून ती सोमवारी (दि.०७) सकाळी सहा वाजेच्या सुमारास ती समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जलजीवन मिशन योजनेचे पाइप चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे.
अभियंता सचिन शरद रेवगडे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तिगाव परिसरात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू असल्याने पाण्याच्या टाकीचे कम्पाउंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ५२८ पाइप ठेवलेले होते. २८ जुलै सकाळी १०.३० ते ७ ऑगस्ट सकाळी ६ वाजेच्या दरम्यान हे पाइप चोरीला गेल्याचे रेवगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्यातील परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी यासंदर्भाने माहिती घेत तपासाच्या सूचना दिल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांसमोर आव्हान
यापूर्वी देखील संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाख ३ हजार ७८४ रुपये किमतीचे पाइप चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या संदर्भाने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाइप चोरीला जात असताना पाइप चोरीचे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाइप चोरीच्या दोन्ही घटनांचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.