पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील राष्ट्रवादीच्या ४२ जणांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 19:30 IST2018-05-24T19:30:24+5:302018-05-24T19:30:30+5:30
पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या राष्ट्रवादीच्या ४२ कार्यकर्त्यांना गुरूवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला.

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील राष्ट्रवादीच्या ४२ जणांना जामीन
अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या राष्ट्रवादीच्या ४२ कार्यकर्त्यांना गुरूवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तेथे तोडफोड करत जगताप यांना पळवून नेले. या प्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह इतर ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी ४४ जणांना अटक केली होती. या सर्वांना जामीन मंजूर झाला आहे. तोडफोडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. २० रोजी संदीप जाधव याला अटक केली होती, तर सोमवारी (दि. २१) या गुन्ह्यातील ४१ जण स्वत:हून हजर झाले. न्यायालयाने या सर्वांना दि. २४ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरूवारी या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कविता नावंदर यांच्यासमोर हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने अॅड़ महेश तवले यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. तो मंजूर करीत न्यायालयाने प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जामिनावर सर्वांची सुटका केली.
जामीन मिळालेल्या कार्यकर्त्यांची नावे
माजी उपमहापौर दीपक सूळ, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, समद खान, आरिफ शेख, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव ढाकणे, आ. संग्राम जगताप यांचा स्वीय सहायक सुहास शिरसाठ, माजी नगरसेवक निखिल वारे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, माजी नगरसेवक अरविंद शिंदे, महेश बुचडे, केरप्पा हुच्चे, सय्यद अब्दुल वाहिद अब्दुल हमीद, सय्यद शादाब इलियास, अशोक रोकडे, आवी इराबत्तीन, सागर शिंदे, धीरज उर्किडे, सुनील त्रिंबके, बबलू सूर्यवंशी, सय्यद मन्सूर मुनीर, सुरेश मेहतानी, सय्यद मतीन खॉजा, प्रकाश भागानगरे, कुलदीप भिंगारदिवे, दत्तात्रय तापकिरे, बीर ऊर्फ दिलदार सिंग अजय सिंग शिख, फारूक अब्दुल अजीज रंगरेज, चंद्रकांत महादेव औशिकर, सत्यजित ढवणे, वैभव जाधव, राहुल शर्मा, मयूर बांगरे, किरण पिसोरे, घनश्याम बोडखे, बाबासाहेब जपकर, राजेंद्र ससे, वैभव दारूणकर, अक्षय डाके, मयूर कुलथे, संदीप रोकडे, संदीप जाधव.