पंढरपूर यात्रेसाठी नगरहून ४०० जादा बसेस
By Admin | Updated: June 29, 2016 00:57 IST2016-06-29T00:49:20+5:302016-06-29T00:57:29+5:30
अहमदनगर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या नगर विभागाकडून ४०० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

पंढरपूर यात्रेसाठी नगरहून ४०० जादा बसेस
अहमदनगर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या नगर विभागाकडून ४०० जादा बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अकरा आगारांतून २५० तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांतून येणाऱ्या १५० गाड्या नगरमार्गे जातील. ११ ते २० जुलै अशा दहा दिवसांत दोन लाख प्रवाशांचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी दिली.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा ‘कॅश’ करण्यासाठी एसटीच्या जादा बसगाड्यांचे नियोजन असते. नगर जिल्ह्यातील संगमनेर, शेवगाव, श्रीरामपूर, कोपरगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, पाथर्डी, अकोले अशा ११ आगारांतून २५० तर धुळे व जळगाव जिल्ह्यातून प्रत्येकी ७५ अशा एकूण ४०० गाड्यांच्या सुमारे तीन हजार फेऱ्या होणार आहेत. संबंधित आगारप्रमुख हे त्या आगारकेंद्राचे प्रमुख म्हणून काम करतील. शेवगाव पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा या आगाराच्या बस माहिजळगाव (ता. कर्जत) मार्गे जातील. तेथे बस दुरुस्ती पथक ठेवण्यात आले आहे. याशिवाय पंढरपूर येथे विठ्ठल कारखाना यात्रा केंद्रावर अहमदनगर विभागाचे शेड असेल. या दहा दिवसांच्या काळात २ लाख प्रवाशांच्या माध्यमातून सुमारे दोन कोटींचा नफा महामंडळाला होणार आहे. मागील वर्षीही ३५२ जादा बस सोडल्या होत्या. त्यातून महामंडळाला दीड कोटीचा नफा झाला होता. पंढरपूरपर्यंत, तसेच परतीच्या प्रवासादरम्यान अधिकाधिक सोई-सुविधा भाविकांना पुरवण्यात येतील, असेही जाधव यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
एखाद्या गावातून बस भरेल एवढे प्रवाशी असतील, तर थेट त्या गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येईल. भाडे आकारणी गावापासून होईल. त्यासाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
४यात्रा कालावधी - ११ ते २० जुलै
४आषाढी एकादशी- (मुख्य दिवस) - १५ जुलै
४आषाढी द्वादशी परतीचा प्रवास - १६ जुलै
४पौर्णिमा - १९ जुलै