मर्जीतील ठेकेदारांना ४० लाखांचे वाटप
By Admin | Updated: July 20, 2014 00:21 IST2014-07-19T23:16:00+5:302014-07-20T00:21:56+5:30
अहमदनगर : प्राधान्यक्रम डावलून मर्जीतील ठेकेदारांना ४० लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मर्जीतील ठेकेदारांना ४० लाखांचे वाटप
अहमदनगर : प्राधान्यक्रम डावलून मर्जीतील ठेकेदारांना ४० लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आयुक्तांनी विशेष मंजुरी देऊन ठेकेदारांची देणी दिली असून स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांनी या प्रकरणी आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
शहरातील विविध विकास कामांपोटी ठेकेदारांचे २६ कोटी महापालिकेला देणे आहे. पण आर्थिक नियोजन कोलमडल्याने हे देणे थकीत आहे. आयुक्त महिनाभराच्या रजेवर गेले. जाता-जाता त्यांनी ठेकेदारांच्या ४० लाख देण्याला विशेष मंजुरी दिली. त्यानंतर प्रभारी आयुक्त असलेले भालचंद्र बेहेरे यांनी देयकासाठी कोणीही भेटू नये असा बोर्ड दरवाजावर लावला. मर्जीतील ठेकेदारांना पैसे दिलेच कसे? असा प्रश्न डागवाले यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
असा झाला निर्णय
ज्या ठेकेदारांची बिले दिली त्यांच्या प्रस्तावावर कनिष्ठ अभियंत्यांनी दिलेले निर्णयही मजेशीर आहेत. चौपाटी कारंजा ते नाना पाटील तालीम रस्त्याचे काम तीन महिन्यापुर्वीच झाले. हे काम करणाऱ्या ठेकेदाराला १४ लाखाचे बिल अदा केले आहे. या रस्त्याने अंत्ययात्रा मोठ्या प्रमाणात जात आहेत़ काम करून खूप दिवस झाले. वारंवार देयके मागितली जातात. त्यामुळे देण्यास हरकत नाही असा अभिप्राय कनिष्ठ अभियंत्याने नोंदविला आहे. त्यावर शहर अभियंत्याने वरीलप्रमाणे निर्णय घ्यावा असा शेरा मारला. उपायुक्तांनी आयुक्तांकडे पाठविला. आयुक्तांची विशेष मंजुरी देऊन देयके अदा केले.