पंढरीच्या वाटेवर धावणार ३६० बसेस
By Admin | Updated: July 3, 2014 00:58 IST2014-07-03T00:30:13+5:302014-07-03T00:58:12+5:30
अहमदनगर : आषाढी वारीसाठी सुमारे २० हजारहून अधिक भाविक एस़ टी़ बसने पंढरपूरला जाण्याची शक्यता असून, नगरहून एस़ टी़ महामंडळाच्या ३६० बसेस पंढरीच्या वाटेवर धावणार आहेत़

पंढरीच्या वाटेवर धावणार ३६० बसेस
अहमदनगर : आषाढी वारीसाठी सुमारे २० हजारहून अधिक भाविक एस़ टी़ बसने पंढरपूरला जाण्याची शक्यता असून, नगरहून एस़ टी़ महामंडळाच्या ३६० बसेस पंढरीच्या वाटेवर धावणार आहेत़
आषाढी वारी जवळ आली की ‘विठ्ठल माझा़़माझा़़माझा़़’ असे म्हणत राज्यभरातून लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीच्या वाटेवर चालू लागतात़ मात्र, अनेकांना पायी दिंडीत जाणे शक्य होत नाही़ त्यामुळे एस़टी़ महामंडळाच्या बस आणि खाजगी वाहनानेही मोठ्या संख्येने भाविक पंढरीला जातात़ ९ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे़ या दिवशी पंढरपूरची मुख्य यात्रा असते़ या यात्रेसाठी भाविकांना जाता यावे, यासाठी एस़ टी़ महामंडळाच्या वतीने दरवर्षी पंढरपूरसाठी जादा बस सोडल्या जातात़ यावर्षी नगर विभागातून ३६० बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक सुरेश संवत्सरकर यांनी दिली़ नगर विभागाच्या २१० व धुळे (७५) व जळगाव (७५) विभागाच्या १५० बसेस अहमदनगर ते पंढरपूर मार्गावर चालविण्यासाठी मागविण्यात आल्या आहेत़ या बसेस ४ जुलै ते १३ जुलैदरम्यान पंढरीच्या वाटेवर धावणार आहेत़ माळीवाडा बसस्थानकातून या जादा बस सुटणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक आगारातूनही पंढरपूरसाठी जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ सर्व भाविकांनी राज्य परिवहन बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संवत्सरकर यांनी केले आहे़
अशा सुटणार जादा गाड्या
तारकपूर३०
पारनेर१९
संगमनेर१९
श्रीगोंदा १८
शेवगाव १८
नेवासा १८
श्रीरामपूर १८
पाथर्डी १७
कोपरगाव १९
अकोले १५
जामखेड १९
माळीवाडा बसस्थानक आणि कोठी ते माळीवाडा बसस्थानकादरम्यान रस्त्यावर ४ जुलै ते १३ जुलैदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी इतर विभागाच्या पंढरपूरकडे जाणाऱ्या बसेस तारकपूर बसस्थानकावरुन सुटून थेट पंढरपूरला जातील़ त्यामुळे इतर विभागाच्या बस यादरम्यान माळीवाडा बसस्थानकात थांबणार नाहीत़
गेल्या वर्षी आषाढी वारीसाठी ३०८ बसेस सोडण्यात आल्या होत्या़ यातून एस़ टी़ महामंडळाला ६६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते़ यावर्षी ५२ बसेस वाढविण्यात आल्या असून, ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा महामंडळाला आहे़