३५ हजार कर्मचारी शोधताहेत शाळाबाह्य विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:27+5:302021-03-10T04:21:27+5:30
अहमदनगर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाची गेल्या दहा दिवसांपासून विशेष मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील ...

३५ हजार कर्मचारी शोधताहेत शाळाबाह्य विद्यार्थी
अहमदनगर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाची गेल्या दहा दिवसांपासून विशेष मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील ३१ हजार शिक्षक व ४ हजार अंगणवाडीसेविका दारोदार भटकंती करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यंदा कोरोनामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
या मोहिमेनुसार शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ३ ते ६ वर्षे वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत, खासगी बालवाडीत जात नाहीत, तसेच ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोध मोहीम १ ते १० मार्च या कालावधीत राबविली जात आहे. या मोहिमेत प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक (प्राथमिक व माध्यमिक) हे प्रगणक म्हणून काम करत आहेत. आपल्या परिसरातील बसस्थानके, वीटभट्ट्या, शेतमजूर, घरकुल मजूर, रेल्वे स्थानक, अस्थायी कुटुंब, कचरा वेचणारी बालके, हॉटेल आदी ठिकाणी काम करणारे बालमजूर आदींसाठी स्वतंत्र प्रगणक नेमलेले आहेत. त्यामुळे एकही बालक सर्वेक्षणातून सुटणार नाही, याबाबत खबरदारी या मोहिमेत घेतली गेली आहे. त्यासाठी जिल्हा, तालुका व गावस्तरावर विविध समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
हे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत; परंतु यंदा कोरोनामुळे शहरी भागात अडचणी येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे अशक्य असून, अनेक सोसायटीत या कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यातूनही मार्ग काढत ही मोहीम सुरू आहे.
---------
मोहिमेत सहभागी कर्मचारी
शिक्षक - ३१५००
अंगणवाडीसेविका ४०००
-----------
कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही शोधमोहीम राबविणारे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे मोहिमेला त्वरित स्थगिती देण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे.
- सुनील गाडगे, राज्य सचिव, शिक्षक भारती संघटना.
--------------
शिक्षक घरी येऊन गेले. त्यात त्यांनी घरात मुले किती? शाळेत कोण कोण जाते? कोरोनामुळे कोणाचे शिक्षण थांबले आहे का? अशी माहिती घेतली.
-पोपट कर्डिले, पालक, वाकडी, ता. राहाता.
---------
कोरोनामुळे मुले शाळाबाह्य किंवा स्थलांतरित झाले का? शालेय मुलांची संख्या, मुलींची संख्या, अशी माहिती शिक्षकांनी घरी येऊन विचारली.
- मिनिनाथ वाबळे, पालक, बनपिंप्री, ता. श्रीगोंदा
-----------समितीची एकदा बैठक
१ ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील समित्यांच्या नियोजन बैठका झालेल्या आहेत. नगर जिल्ह्यात अशी एक एक बैठक झाली आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून मिळाली.
--------------
शाळाबाह्य मुले-मुुलींची शोध मोहीम दरवर्षीच असते; परंतु यंदा कोरोनामुळे बऱ्याच कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे किंवा नवीन कुटुंबे दाखल झाली आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम आहे. १० मार्चपर्यंत ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
--------
फोटो - ०९चिल्ड्रेन डमी