३५ वर्षांनंतर नगरने पटकावला पुरुषोत्तम करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 20:03 IST2017-09-11T19:59:59+5:302017-09-11T20:03:07+5:30

अहमदनगर : राज्यभरातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून गौरविलेला पुरुषोत्तम करंडक यंदा अहमदनगरच्या ‘माईक’ने पटकावला. ३५ वर्षे नगरला हुलकावणी देणारा पुरुषोत्तम ...

35 years later the city won the Purushottam Trophy | ३५ वर्षांनंतर नगरने पटकावला पुरुषोत्तम करंडक

३५ वर्षांनंतर नगरने पटकावला पुरुषोत्तम करंडक

ठळक मुद्देन्यू आर्टस् कॉलेजची ‘माईक’ व सारडा कॉलेजची ‘ड्रायव्हर’ या नगरच्या दोन एकांकिकांनी अंतिम फेरी गाठली होती़‘माईक’ने करंडकासह अभिनय, दिग्दर्शनासाठी पारितोषिके पटकावली.माईक’चे दिग्दर्शक कृष्णा वाळके व विराज औचित्य याला अभिनयाचे पारितोषिक मिळाले.‘ड्रायव्हर’मधील हरीश बारस्कर याला अभिनयाचे उतेजनार्थ पारितोषिक मिळाले.

अहमदनगर : राज्यभरातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून गौरविलेला पुरुषोत्तम करंडक यंदा अहमदनगरच्या ‘माईक’ने पटकावला. ३५ वर्षे नगरला हुलकावणी देणारा पुरुषोत्तम करंडक संदीप दंडवते लिखित ‘माईक’ एकांकिकेने पटकावून इतिहास घडविला आहे.
        पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोन वेळाच नगरने हा करंडक पटकावला होता. सातत्याने पुरुषोत्तम महाकरंडक स्पर्धेत नगरमधील महाविद्यालयांचे संघ सहभागी होत आले आहेत. मात्र, प्रत्येक वर्षी निराशाच पदरात घेऊन नगरचे संघ परतत होते़ यंदा मात्र, ही अपयशाची साखळी तोडण्याची कामगिरी ‘माईक’ने केली़ नगरच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या ‘माईक’ने तब्बल ३५ वर्षांनंतर पुरुषोत्तम करंडक पटकावला आहे़ ‘भॉ’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक संदीप दंडवते यांनी ‘माईक’चे लिखाण केले आहे़ राजकीय आणि जातिव्यवस्थेवर थेट भाष्य करणा-या ‘माईक’ने पुरुषोत्तम स्पर्धा गाजवून करंडकावर नाव कोरले़ ‘माईक’चे दिग्दर्शन कृष्णा वाळके याने केले़ विराज औचित्य, ऋषभ कोंडावार, संकेत जगदाळे, निखिल शिंदे, अमित रेखी, शुभम पोपळे, आकाश मुसळे, अभिषेक रकटे यांच्यासह दिग्दर्शक असलेल्या कृष्णा वाळके यानेही दमदार अभिनय करीत अंतिम फेरी गाजवली़ त्यांना श्रेयस बल्लाळ याने संगीत, तर अमोल साळवे याने प्रकाश योजनेची जबाबदारी सांभाळून तितकीच मोलाची साथ दिली़ प्रियंका तेलतुंबडे, संदीप कदम यांनी बॅक स्टेजची जबाबदारी यथायोग्य पार पाडली. अंतिम स्पर्धेसाठी राज्यभरातील ९ एकांकिका निवडण्यात आल्या होत्या़ त्यात नगरच्याच दोन एकांकिकांचा समावेश होता़ न्यू आर्टस् कॉलेजची ‘माईक’ व सारडा कॉलेजची ‘ड्रायव्हर’ या नगरच्या दोन एकांकिकांनी अंतिम फेरी गाठली होती़ अंतिम फेरीत ‘माईक’ने करंडकासह अभिनय, दिग्दर्शनासाठी पारितोषिके पटकावली़ माईक’चे दिग्दर्शक कृष्णा वाळके याला दिग्दर्शन व अभिनयासाठी उत्तेजनार्थ, तर विराज औचित्य याला अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
‘सारडा’च्या ‘ड्रायव्हर’चे लिखाण अमोल साळवे याने केले असून, दिग्दर्शन विनोद गरुड याने केले़ ‘ड्रायव्हर’मधील हरीश बारस्कर याला अभिनयाचे उतेजनार्थ पारितोषिक मिळाले़ पुण्यातील एकापेक्षा एक तगड्या संघांना टक्कर देत नगरच्या ‘माईक’ने पुरुषोत्तम करंडक पटकावला़ समर नखाते, अमिता खोपकर आणि मिलिंद फाटक यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. भरतनाट्य मंदिर येथे येत्या १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता न्यू आर्टस्च्या संघाला पुरुषोत्तम करंडक प्रदान करण्यात येणार आहे़

२०१४ नंतर २०१७
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या गेल्या ५४ वर्षांच्या इतिहासात नगरकरांनी यापूर्वी फक्त दोन वेळाच पुरुषोत्तम करंडक पटकावला आहे़ २०१४ साली ही संधी नगरकरांना ‘हिय्या’च्या रूपाने आली होती़ परंतु ‘हिय्या’ला दुस-या क्रमांकांवरच समाधान मानावे लागले़ विशेष म्हणजे ‘हिय्या’ एकांकिकाही संदीप दंडवते यांनीच लिहिलेली आहे़ २०१४ नंतर आता २०१७ मध्ये पुन्हा संदीप दंडवते लिखित ‘माईक’ पुरषोत्तममध्ये दाखल झाली आणि करंडक पटकावला़

नगर जिल्ह्याला चौथ्यांदा ‘पुरुषोत्तम’
महाविद्यालयीन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १९६३ साली पुण्यात पहिल्यांदा पुरुषोत्तम स्पर्धेचा बिगुल वाजला़ त्यानंतर सातत्याने गेली ५४ वर्षे ही स्पर्धा सुरू आहे़ पुरुषोत्तममध्ये यापूर्वी मैत (१९८१) आणि कळकीचं बाळ (१९८२) या एकांकिकांनी पुरुषोत्तम करंडक पटकावला होता. त्यानंतर २०१७ मध्ये म्हणजेच तब्बल ३५ वर्षांनंतर नगरकरांनी पुरुषोत्तम करंडकवर नाव कोरले़ संगमनेर महाविद्यालयानेही १९९३ मध्ये पुरुषोत्तम करंडक पटकावला होता़ त्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची संधी संगमनेर महाविद्यालयाने मात्र गमावली.

‘माईक’वाल्यांचा सत्कार
पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत न्यू आर्टस् कॉलेजच्या ‘माईक’ने पटकावल्यानंतर या संघाचा नाट्य परिषद नगर शाखेच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ यावेळी सतीश लोटके, पी. डी. कुलकर्णी, सदानंद भणगे, श्याम शिंदे, अमोल खोले, स्वप्नील मुनोत, शशिकांत नजान, अभिजित दरेकर, प्रशांत जठार, नाना मोरे, अविनाश कराळे, लेखक संदीप दंडवते, दिग्दर्शक कृष्णा वाकळे उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार देशमुख यांनी केले. तुषार चोरडिया यांनी आभार मानले.

Web Title: 35 years later the city won the Purushottam Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.