जिल्ह्यात ३४०० शाळांना नाही इंटरनेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:19+5:302021-07-14T04:24:19+5:30
चंद्रकांत शेळके लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील केवळ १९६३ शाळांना इंटरनेटची सोय असून तब्बल ३ हजार ४१३ शाळांत ...

जिल्ह्यात ३४०० शाळांना नाही इंटरनेट
चंद्रकांत शेळके
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील केवळ १९६३ शाळांना इंटरनेटची सोय असून तब्बल ३ हजार ४१३ शाळांत इंटरनेटची सुुविधा नाही. त्यामुळे या शाळांत ॲानलाइन शिक्षण देण्यात अडचणी येत आहेत.
कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु ते देताना जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये इंटरनेट, विजेची सोय नाही. त्यामुळे अनेक शिक्षक, विद्यार्थ्यांना केवळ मोबाइलच्या आधारेच ऑनलाइन एज्युकेशन द्यावे लागत आहे.
आरटीई कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेट, वीज असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करायचा असेल तर शाळांमध्ये इंटरनेट हवेच. परंतु शासनाच्या शिक्षणविषयक उदासीन धोरणांमुळे अनेक शाळांमध्ये इंटरनेट पोहोचलेले नाही. शाळेतील शैक्षणिक कामांबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संगणक, इंटरनेटचा मोठा उपयोग होतो.
नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा एकूण ५ हजार ३७६ शाळा आहेत. यातील केवळ १९६३ शाळांमध्ये इंटरनेटची सोय आहे, तर तब्बल ३ हजार ४१३ शाळांमध्ये इंटरनेटची सोय नाही. त्यामुळे शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना बाहेरील इंटरनेट कॅफेवर जाऊन शैक्षणिक कामे करावी लागतात. शिवाय आता कोरोनाच्या काळात ॲानलाइन शिक्षणावर इंटरनेट नसल्याने परिणाम होत आहे.
--------------
शाळांची संख्या
स्थानिक स्वराज्य संस्था - ३६२५शासकीय - ३१
अनुदानित - १००५
विनानुदानित - ७१५
--------
इंटरनेट सुविधा असलेल्या शाळा - १९६३
--------------
शाळेत इंटरनेट नसल्याने अनेक अडचणी येतात. सध्या कोरोनामुळे ॲानलाइन शिक्षण देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ज्या मुलांकडे मोबाइल किंवा इतर सुविधा नाहीत, त्या मुलांच्या घरी जाऊन अभ्यासक्रम दिला जातो.
- एक शिक्षक
-----------
ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कच्या अडचणी असल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येतात. घरची आर्थिक स्थितीही बेताचीच असल्याने स्मार्ट फोन घेणे व ते सतत रिचार्ज करणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात.
- सोमनाथ पवार, विद्यार्थी
--------------
माझा पाल्य इंग्रजी शाळेमध्ये आहे. शाळेत इंटरनेटची सोय आहे. शिक्षकही ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देतात. परंतु आता विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा शासनाने सुरू करायची गरज आहे.
- सुभाष शर्मा, पालक
----------
अनेक शाळांत इंटरनेटची सुविधा आहे. परंतु जेथे नाही तेथे शिक्षक आपल्या मोबाइलचा वापर करतात. ज्या गावात ॲानलाइनच्या कोणत्याच सुविधा नाहीत तेथील शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्याच्या घरी जाऊन किंवा स्वाध्यायपुस्तिका देऊन अभ्यासक्रम देतात. शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही, याची खबरदारी शिक्षण विभाग घेत आहे.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक