बिबट्याच्या हल्ल्यात ३४ वर्षीय युवक ठार; जंगलात ओढत नेले, शरीरावर जखमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 23:44 IST2024-12-23T23:43:16+5:302024-12-23T23:44:33+5:30
गणेश दादाभाऊ शिरतार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात ३४ वर्षीय युवक ठार; जंगलात ओढत नेले, शरीरावर जखमा
संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाच्या हद्दीत संगमनेरातील हिवरगाव पावसा शिवारात रामनाथ सूर्यभान गुरुकुले (वय ३४, रा. सावरगाव तळ) यांचा मृतदेह आढळून आला. बिबट्याने त्यांना ओढत जंगलात नेले, त्यांच्या शरीरावरील अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊन अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संगमनेर भाग १चे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे देखील तेथे पोहोचले. पोलिस काही अंतर पुढे जाऊन पाहत असताना गवताला, दगडांना रक्ताचे डाग लागलेले दिसले. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत एकाचा मृतदेह त्यांना आढळून आला. शरीरावरील अनेक ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या होत्या. बिबट्याच्या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असता हा मृतदेह सावरगाव तळ येथील रामनाथ गुरुकुले यांचा असल्याची खात्री पटली. गणेश दादाभाऊ शिरतार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुचाकी, चपला अन् रक्ताचे डाग
हिवरगाव पावसा शिवारात दुचाकी दिसत आहे, जवळच चपला पडल्या असून रक्ताचे डाग दिसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस हवालदार अमित महाजन, आशिष आरवडे आदी तातडीने घटनास्थळी पोहोचले.