३३ आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीला दोनदा मुदतवाढ देऊनही कामे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:58+5:302021-02-12T04:20:58+5:30

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात येणाऱ्या ३३ आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदार एजन्सीला दोन वेळा ...

33 health sub-centers repaired twice | ३३ आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीला दोनदा मुदतवाढ देऊनही कामे ‘जैसे थे’

३३ आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीला दोनदा मुदतवाढ देऊनही कामे ‘जैसे थे’

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात येणाऱ्या ३३ आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदार एजन्सीला दोन वेळा मुदतवाढ देऊनही अपूर्णच आहेत. ठेकेदार एजन्सीच्या अट्टहासापायी आरोग्य उपकेंद्रांचा कायापालट रखडला असून अपूर्ण कामांमुळे दैनंदिन कामकाजासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी या कामांसाठी खर्च होणार आहे. तीन ग्रुपमध्ये विभागलेली सर्व कामे एकाच ठेकेदार एजन्सीकडे असून दंडात्मक कारवाईसह २८ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदतवाढीपर्यंतही कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही.

केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत अभियान अंतर्गत तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३३ उपकेंद्रांचा कायापालट होऊन नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रूपांतरित होणार आहे. त्यासाठी सर्व आरोग्य केंद्रांची रंगरंगोटी, बाह्यरूप आणि आतील सुशोभिकरण, दर्शनी भिंतीवर वारली प्रकारची पेंटिंग करण्यात येणार आहे. तसेच पायाभूत सुविधांतर्गत सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत प्रतीक्षा कक्ष, प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आंतररुग्ण कक्ष, औषध साठवणी भांडार कक्षांची प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

१३ प्रकारच्या आरोग्य सुविधा आरोग्यवर्धिनी केंद्रात मिळणार आहेत.

दुरुस्तीसाठी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १६ लाख ७२ हजारांचा निधी मंजूर झाला होता यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. तर ३३ आरोग्य उपकेंद्रांसाठी १ कोटी ६० लाख ६१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यातील ३३ उपकेंद्रांची कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. आढळगाव, घोडेगाव, शेडगाव, हिरडगाव, टाकळी लोणार या ठिकाणी कामे फक्त सुरू करण्यात आली. बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडल्यामुळे दैनंदिन कामकाज करणे अडचणीचे झाले आहे. अर्धवट कामांमुळे लसीकरणासाठी आणलेले साहित्य आणि आरोग्य केंद्रातील औषधे आणि इंजेक्शन्स आदींचा साठा करणे जिकिरीचे झाले आहे.

------

आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात येणाऱ्या ३३ उपकेंद्रांची कामांसाठी संबंधित ठेकेदार एजन्सीला दंडात्मक कारवाईसह २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- प्रदीप गाडे,

कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद

फोटो

११ हिरडगाव

हिरडगाव येथील आरोग्य केंद्र परिसरात अस्ताव्यस्त स्थितीमध्ये पडलेले बांधकाम साहित्य आणि रंगरंगोटीच्या प्रतीक्षेत असलेली इमारत.

Web Title: 33 health sub-centers repaired twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.