शहरात हॉटेल्सना ३०० कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:37+5:302021-07-31T04:22:37+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे नगर शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉक करण्याची वेळ आली आहे. सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे मागील १६ महिन्यांत ...

शहरात हॉटेल्सना ३०० कोटींचा फटका
अहमदनगर : कोरोनामुळे नगर शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉक करण्याची वेळ आली आहे. सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे मागील १६ महिन्यांत हॉटेल व्यवसायाला सुमारे ३०० कोटींहून अधिकचा फटका बसल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यवसायाचा आर्थिक कणा मोडला असून, हॉटेल व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे.
औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कल्याण, मनमाड असे महामार्ग नगर शहरातून जातात. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी जेवणासाठी नगर शहर व परिसरातील हॉटेल्समध्ये थांबतात. त्यामुळे येथील हॉटेल्समध्ये रेलचेल असते. मात्र कोरोनाचा संसर्ग व त्यानंतर लागलेला लॉकडाऊन यामुळे हॉटेल्स व्यवसाय मोडून पडला आहे. हाॅटेल व्यवसाय केवळ निवास आणि भोजनाची सुविधा एवढ्यापुरताच मर्यादित नसून, अन्य ५० हून अधिक व्यवसायांशी जोडलेला आहे. दूध, भाजीपाला, बेकरी उत्पादनांवरही याचा परिणाम झाला आहे. शहरात मोठी दहा हॉटेल्स आहेत. त्यांची प्रत्येकाची वार्षिक उलाढाल सरासरी १५ कोटींच्या घरात आहे. रेस्टॉरंट, बार, शाकाहारी, मांसाहारी जेवणाची लहान-मोठी पाचशेहून अधिक हॉटेल्स आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींहून अधिक आहे. हाॅटेल्स व्यवसायातील उलाढाल मोठी असली तरी गुंतवणूकही मोठी आहे.
सध्या दुपारी चारपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच पार्सल सुविधा पुरविण्यासही परवानगी आहे. परंतु, दिवसभर व्यवसाय होत नाही. ग्राहक रात्रीच्या वेळी जेवणासाठी येतात. पण, रात्री हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. हॉटेलचा परिसर मोठा आहे. रात्रीच्या वेळी नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवणे व्यावसायिकांना शक्य आहे. वेळोवेळी मागणी करून रात्री हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे कामगारांचा पगार, वीज बिल, साफसफाई हा सर्व खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न सध्या हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे.
....
पूर्ण क्षमतेने परवानगी द्या
सध्या अनलॉक काळात दुपारी ४ वाजेनंतर हॉटेलमध्ये बसणे बंद होते व पार्सल सुविधा सुरू होते. येथील हॉटेलचा ६० टक्के व्यवसाय हा सायंकाळनंतरच होतो. हा ६० टक्के व्यवसाय बुडाल्याने हॉटेल उद्योग कोलमडला आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल पूर्ण क्षमतेने चालविण्यास परवानगी दिली तरच हा व्यवसाय तग धरू शकेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
...
तीन हजार कर्मचारी बसले घरी
सध्या हॉटेल्स निम्म्याच क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे कामगार संख्येवरही गदा आली आहे. आजघडीला तीन हजारांहून अधिक कामगार घरी बसून आहेत. व्यावसायिक उत्पन्न बंद आहे. पण, देखभाल-दुरुस्तीचा खर्च, व्यवसाय कर, वीज बिल, मालमत्ता कर, कर्मचाऱ्यांचे पगार सुरूच आहेत.
....
जिल्हा प्रशासनाने दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल्सना परवानगी दिलेली आहे. परंतु, ६० टक्के व्यवसाय रात्रीच होतो. दिवसभर परवानगी मिळते; मग रात्रीच्या वेळी कोरोना येतो का? रात्री हॉटेल्स सुरू ठेवल्याने संसर्ग वाढणार आहे का? प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. बँकांचे हप्ते सुरू आहेत. तसेच कामगारांचे पगार, वीज बिल यासह अन्य खर्च आहे. तो भागवायचा कसा, असा प्रश्न आहे.
- सुनील काळे, हॉटेल व्यावसायिक
.....
मागण्या
१) पूर्ण क्षमतेने हॉटेल उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे
२) रात्री १० वाजेपर्यंत हॉटेलमध्ये जेवणास परवानगी द्यावी
३) बँकेतून जे कर्ज काढले आहे, त्या कर्जाऊ रकमेच्या हप्त्याची परतफेड करण्यास वर्षभरासाठी स्थगिती मिळावी
४) जीएसटीमधून सवलत मिळावी
.....
सूचना : फोटो ३० हॉटेल नावाने आहे.