३० टक्के पोलीस आजारी
By Admin | Updated: August 19, 2014 23:31 IST2014-08-19T23:13:49+5:302014-08-19T23:31:14+5:30
अहमदनगर : मुंबईमध्ये ३० टक्के पोलिसांना रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचे आजार आहेत. अशीच स्थिती जिल्ह्यातील पोलिसांचीही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

३० टक्के पोलीस आजारी
अहमदनगर : मुंबईमध्ये ३० टक्के पोलिसांना रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचे आजार आहेत. अशीच स्थिती जिल्ह्यातील पोलिसांचीही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे आजार एकदा जडले की ते कायमस्वरुपी राहतात. त्यामुळे पोलिसांनी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी दररोज खेळासाठी ४५ मिनिटे द्यावीत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी केले.
जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांचे मंगळवारी (दि.१९) सायंकाळी शानदार उद्घाटन झाले. खेळाडूंच्या विविध पथकांनी रंगीबेरंगी जॅकेट घालून सय्यद अन्वर यांच्या नेतृत्त्वाखाली शानदार संचलन केले. बाबा कोरेकर यांनी क्रीडा मशाल संचलित करून पोलीस अधीक्षक गौतम यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी मशालीद्वारे क्रीडाज्योत प्रज्वलीत केली. रंगीबेरंगी फुगे आणि कबुतरे आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले.
प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाच्या देशभक्तीपर गीतांच्या साथीने खेळाडूंनी शानदार संचलन केले. क्रीडाज्योत प्रज्वलीत झाल्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपविभागीय अधिकारी वाय.डी. पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, लक्ष्मण काळे, सीआयडीचे विवेक पाटील, राहुल पाटील यांच्यासह पाचही विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)