चिलेखनवाडीत २६ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:35+5:302021-07-12T04:14:35+5:30
कुकाणा : चिलेखनवाडी (ता. नेवासा) येथे लपवून ठेवलेल्या गांजाच्या ठिकाणी नेवासा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी २६ किलो ...

चिलेखनवाडीत २६ किलो गांजा जप्त
कुकाणा : चिलेखनवाडी (ता. नेवासा) येथे लपवून ठेवलेल्या गांजाच्या ठिकाणी नेवासा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी २६ किलो गांजासह २ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अजिंक्य त्रिंबक ससाणे (वय २१) दत्तू उर्फ आकाश मच्छिंद्र सावंत (वय २२) खंडू उर्फ रोहिदास भगवान गुंजाळ (वय ३०, सर्व रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा) व खाटीक (पूर्ण नाव समजले नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या
मार्गदर्शनाखाली कुकाणा पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी सकाळी आकाश सावंत हा दुचाकीवरून गांजा घेऊन कुकाण्याकडे येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक करे यांना मिळाली. त्यानुसार कुकाणा पोलीस दूरक्षेत्रातील हवालदार बबन तमनर, दिलीप राठोड व अंबादास गीते हे कुकाणा येथील जेऊर हैबती चौकात सापळा रचून बसले होते. आकाश हा सकाळी सहाच्या सुमारास चिलेखनवाडी मार्गाने चौकात येताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे अंदाजे एक किलो गांजा आढळला.
यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा हे पोलीस पथक घेऊन कुकाण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच आकाशने इतर साथीदार व मालाची माहिती दिली. पोलिसांनी चिलेखनवाडी येथून इतर तिघांना त्वरित ताब्यात घेतले. येथीलच मुळा पाटबंधारे वसाहतीमधील एका बंद खोलीतून २५ किलो गांजा हस्तगत केला.
----
शेवगावमधून आणला गांजा...
त्या चौघांनी हा गांजा शेवगाव येथून आणला होता. तो घोडगाव येथे विकण्याची त्यांची तयारी झाली होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली.
---
११ चिलेखनवाडी
चिलेखनवाडी (ता. नेवासा) येथील मुळा पाटबंधारेच्या याच वसाहतीतील पडक्या इमारतीत आरोपींनी गांजा लपवून ठेवला होता.