जिल्ह्यात २५ हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:40+5:302020-12-13T04:35:40+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील तब्बल २५ हजार ५०० विद्यार्थ्यांना अद्यापही ऑनलाइन किंवा ऑफलाइन असे कोणतेही शिक्षण मिळत नसल्याने ते शिक्षणापासून ...

जिल्ह्यात २५ हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
अहमदनगर : जिल्ह्यातील तब्बल २५ हजार ५०० विद्यार्थ्यांना अद्यापही ऑनलाइन किंवा ऑफलाइन असे कोणतेही शिक्षण मिळत नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मागील पंधरा दिवसांच्या अहवालातून हे चित्र समोर आले आहे.
कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व शहरी भागात महानगरपालिकेच्या, तसेच इतर सर्वच खासगी शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देत आहेत, तर दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणाची साधने नसल्यास शिक्षक ऑफलाइन शिक्षणाची सोय करत आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत; परंतु या काळातही पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू राहण्याच्या अनुषंगाने कार्यरत राहायचे असल्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
ऑनलाइन वर्ग घेताना किती शिक्षक झूम किंवा गुगल मीट वापरतात, किती शिक्षक व्हॉटसअॅप ग्रुप, दीक्षा अॅप, लिंक व्हिडिओ किंवा ऑनलाइन टेस्टद्वारे अध्यापन करतात? ऑनलाइन शक्य नाही तेथे आठ-पंधरा दिवसांचा अभ्यास लिहून (हार्डकॉपी) मुलांना दिला का? विद्यार्थी-पालक यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना अभ्यासक्रम दिला का?
किती विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत? विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन साधने आहेत का? तसेच किती विद्यार्थ्यांकडे साधने नाहीत, अशी माहिती दर आठवड्याला सादर करावी, असे आदेश सीईओंनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून असा अहवाल मागवला जात आहे. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्याचा अहवाल शिक्षण विभागास प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात २५ हजार ५०० विद्यार्थ्यांना सध्या कोणतेच शिक्षण मिळत नाही. यात जिल्हा परिषद शाळांचे ४ हजार ६००, तर इतर शाळांचे २० हजार ९०० विद्यार्थी आहेत.
------------
६३ शिक्षक करत नाहीत कोणतेच अध्यापन
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे ११ हजार ५२९, तर इतर व्यवस्थापन शाळांचे २० हजार ६२३ असे एकूण ३२ हजार १५२ शिक्षक आहेत. त्यापैकी ६३ शिक्षक सध्या कोणतेही अध्यापक करत नाहीत. उर्वरित सर्व शिक्षक ऑनलाइन, ऑफलाइन किंवा इतर मार्गाने अध्यापनाचे काम करतात, असे या अहवालात नमूद आहे.
-----------
शाळांतील हजेरीही तुटपुंजी
गेल्या तीन आठवड्यांपासून शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे; परंतु यासाठी विद्यार्थ्यांची तुटपुंजी हजेरी आढळत आहे. मागील आठवड्यात नववी ते बारावीच्या एकूण २ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांपैकी अवघे नऊ हजार विद्यार्थी उपस्थित राहत होते. हे प्रमाण केवळ तीन टक्के आहे. यातून शाळा सुरू करण्याचा शासनाचा उद्देश सफल झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.