मुळा जलाशयावर २५० बंदिस्त मत्स्यपालन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:33 IST2019-06-25T15:32:49+5:302019-06-25T15:33:13+5:30
मुळा धरणावर आशिया खंडातील सर्वात मोठा मत्स्य प्रकल्प उभा राहत असून, २५० बंदिस्त मत्स्यपालन संवर्धन केंद्र साकारले आहेत़

मुळा जलाशयावर २५० बंदिस्त मत्स्यपालन केंद्र
भाऊसाहेब येवले
राहुरी : मुळा धरणावर आशिया खंडातील सर्वात मोठा मत्स्य प्रकल्प उभा राहत असून, २५० बंदिस्त मत्स्यपालन संवर्धन केंद्र साकारले आहेत़ ५५ पिंजरे तयार झाले असून मत्स्यपालनाला प्रत्यक्ष सुरूवातही झाली आहे़ येथील मासे कॅनडा, चीन, इंडोनेशिया या देशांमध्ये जाणार आहेत़
मुळा धरणाच्या जलाशयाच्या १ टक्के क्षेत्रावर हे मत्स्यपालन संवर्धन केंद्र साकारात आहेत़ सध्या त्यातून २५० लोकांना रोजगारही उपलब्ध होत आहे़ पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या संकल्पनेतून धरणावर पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्याचे प्रकल्प मंजूर करण्यात आले़ त्यानुसार लाभार्थींनी महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास महामंडळाकडे रितसर परवानगी घेतली़ महामंडळाने प्रकल्प उभारणाऱ्यांना १५ गुंठे जलाशयाचे क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे़
उपलब्ध जलाशयावर ५५ गोड्या पाण्यातील बंदिस्त मत्स्यपालन सुरू करण्यात आले आहे़ अन्य प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे़ प्रत्येक मत्स्यपालन केंद्रात १ ते दीड लाख मत्स्यबीज सोडण्यात आले आहे़त.
मत्स्यबीजासाठी लागणारे खाद्य पुरविले जात आहे़ पिंजºयात वाढविलेल्या मत्स्यबीजाची चांगल्या प्रकारे वाढ होत आहे़ डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मासे विक्रीस उपलब्ध होणार आहे़त. मुळा धरणातील माशांसाठी मुंबईसह गुजरात येथील व्यापारी मत्स्यसंवर्धन करणाऱ्यांशी संपर्क साधून आहेत़ धरणात उपलब्ध झालेले मासे सातासमुद्रापार विक्रीस जाणार आहेत़
२ हजार लोकांना रोजगार
बंदिस्त मत्स्यपालन व्यवसायाच्या माध्यामातून २ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे़ त्यातून अब्जावधी रूपयांची उलाढाल होणार आहे़ केंद्र व राज्य सरकारकडून या प्रकल्पास अनुदान दिले आहे़ महामंडळाने व्यावसायिकांशी सात वर्षांचा करार केला आहे़
मुळा धरण जलाशयाच्या १ टक्के जागेवर मत्स्य संवर्धन प्रकल्प साकारत आहे़ मत्स्यमहामंडळाने रितसर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे़ मुळा धरणातील गोड्या पाण्यातील या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे़ -शिवम सोनवणे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी
एका प्रकल्पावर ७५ लाख रूपये खर्च झाले आहेत़ दोन वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता़ त्यामुळे राहुरी तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल़ -शरद बाचकर, संदीप वराळे, मत्स्य व्यावसायिक